हे स्वत:च लटकते, भटकते आत्मे

राऊत यांची उदय सामंतांवर टीका

। नवी मुंबई । प्रतिनिधी ।

शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खा. संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील पालकमंत्रीपदाच्या वादावरून महायुतीतील नेत्यांवर तीव्र टीका केली आहे. शिंदे गटातील काही नेत्यांना पालकमंत्रीपद न मिळाल्याने निर्माण झालेल्या असंतोषावर राऊत यांनी भाष्य केले आहे. त्यांनी महायुतीतील नेत्यांना अस्थिर आत्मे असल्याचे संबोधित केले आणि त्यांच्या विजयाबद्दल समाधान व्यक्त करण्याचा सल्ला दिला. तसेच, महाराष्ट्राच्या प्रतिमेचा विचार करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

ठाकरेंचे 4 आमदार आणि 3 खासदार हे एकनाथ शिंदेंना भेटल्याचा दावा उदय सामंत यांनी केला होता. त्यावरूनच राऊत यांनी टीकास्त्र सोडले आहे. दावोसमध्ये बसून तुम्ही पुन्हा पक्ष फोडण्याची भाषा करत आहात, लाज कशी वाटत नाही तुम्हाला? मरण पत्करू परंतु, यांना शरण जाणार नाही, अशी आमच्या आमदार-खासदारांची भूमिका असल्याचे सांगत संजय राऊतांनी महायुतीतील नेते उदय सामंत नेत्यांवर हल्ला बोल चढवला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, सध्या पालकमंत्रीपदासाठी रस्त्यावर आंदोलन सुरू आहेत, हे लोक या महाराष्ट्राचा कारभार बघणार का? आयुष्यभर यांनी फोडाफोडी केली, स्वत:ही फुटलेत. हे अस्वस्थ आत्मे आहेत. त्यांनी शरद पवार यांना भटकता आत्मा असे म्हटले होते; परंतु, हे स्वत:च लटकते आणि भटकते आत्मा आहेत, अशा शब्दांत संजय राऊत यांनी महायुतीतील नेते उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला आहे.

Exit mobile version