विभागीय सहनिबंधक तुषार काकडे यांचे गौरवोद्गार
| रायगड | खास प्रतिनिधी |
जिल्हा सहकारी बँक ही देशातील सहकार क्षेत्रात मार्गदर्शक ठरलेली असून, सहकारी संस्थांसाठी रोल मॉडेल म्हणून कार्य करत आहे, असे गौरवोद्गार मुंबई विभागीय सहनिबंधक तुषार काकडे यांनी केले. प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थांच्या कार्यशाळेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यशाळेचे आयोजन रायगड जिल्हा सहकारी बँकेच्या सभागृहात सोमवारी (दि.27) करण्यात आले होते. रायगड जिल्हा सहकारी बँक देशातील प्राथमिक कृषी सहकारी संस्थांचे संगणकीकरण करणारी पहिली बँक आहे आणि देशातील सहकारी बँकिंग क्षेत्रातील अभिनव प्रयोग बँकेने यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. त्यामुळेच सहकारी संस्थांमधील ई-ऑडिटची संकल्पना प्रभावीपणे राबवण्यासाठी आज ही कार्यशाळा सर्वप्रथम आयोजित करण्याचा बहुमान रायगड जिल्हा सहकारी बँकेला देण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी सहकार क्षेत्रातील उपस्थित अधिकार्यांना दिली.
यावेळी मुंबई विभागीय सहनिबंधक तुषार काकडे यांनी रायगड जिल्हा सहकारी बँकेने सहकार क्षेत्रात केलेल्या पायाभूत आणि नाविन्यपूर्ण कामगिरीबद्दल कौतुक केले. तसेच रायगड जिल्हा सहकारी बँकेने कृषी कर्ज डेबिट कार्ड (केसीसी) वितरणामध्ये देशात अग्रेसर राहून नवीन आदर्श निर्माण केला आहे. बँकेने 2008 साली संगणकीकरण प्रक्रिया पूर्ण करून इतर सहकारी संस्थांना या प्रक्रियेचे महत्त्व समजावले, शिवाय सातत्याने बँकेने आपला अ ऑडिट वर्ग कायम राखत आपली प्रगती साध्य केली आहे, त्याबद्दल बँकेचे अभिनंदन केले.
कार्यशाळेच्या प्रारंभी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी बँकेच्या स्थापनेपासूनच्या उल्लेखनीय प्रवासाचा आढावा घेतला. त्यांनी बँकेच्या सहकार क्षेत्रातील कामगिरीची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. त्यांनी सांगितले की, रायगड जिल्हा सहकारी बँक केवळ बँकिंग सेवांपुरती मर्यादित नसून, ग्रामीण भागातील रोजगारनिर्मिती, महिलांच्या स्वयंसेवी गटांना आर्थिक सहाय्य आणि डिजिटल बँकिंग सेवा पुरवण्यातही आघाडीवर आहे. नाबार्डने देशपातळीवर आयोजित केलेल्या ओडिशा येथील कार्यक्रमामध्येदेखील बँकेच्या कामगिरीचे सादरीकरण करण्याचा बहुमान आम्हाला प्राप्त झाला होता. त्यामध्ये सहकार क्षेत्राचे आणि विशेषतः सहकार विभागाचे सहकार्य बँकेला लाभत असल्याने बँकेचा बहुमान वाढतो, त्याबद्दल सहकार विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये विशेष आभार व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, सहकार विभागाचे जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-1 रायगडचे उमेश तुपे, मुंबई विभागाचे के.आर. खिलारी, फिरते विभाग, मुंबईचे निलेश नाईक, रत्नागिरीचे प्रकाश मांढरे, सिंधुदुर्गचे विनोद अंद्रसकर आणि जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग 2 पेणचे एस.आर. पिंपरकर, बँकेचे वरिष्ठ अधिकारी संजय देशमुख, अजित भगत, मंगेश ठाकूर, महेंद्र माळी, भरत पाटील, संदेश पाटील, मिलिंद वाड हे उपस्थित होते.
यावेळी बँकेच्या कर्ज विभागाचे चीफ मॅनेजर संजय देशमुख यांनी संगणकीकरण प्रक्रियेत बँकेच्या योगदानाचा सखोल आढावा घेतला. त्यांनी उपस्थितांना बँकेच्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपाययोजनांची माहिती दिली. तसेच योगेश पाटील आणि नेहा पाटील यांनी ई-ऑडिट प्रक्रियेवर सादरीकरण केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेया शिंदे यांनी केले. बँकेच्या कर्ज विभागाने कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी महत्त्वाचे योगदान दिले. या कार्यक्रमात बँकेच्या सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीवर आणि ई-ऑडिट प्रक्रियेच्या महत्त्वावर सविस्तर चर्चा झाली. कार्यशाळेच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी रायगड जिल्हा सहकारी बँकेच्या कामगिरीचे कौतुक करत इतर सहकारी संस्थांनीही या बँकेकडून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले.