। मुंबई । प्रतिनिधी ।
एकनाथ शिंदेंच्या घरात बाळासाहेब ठाकरेंचा नाही तर अमित शाह यांचा फोटो हवा. कारण अमित शाह हे शिंदेंचे दैवत आहेत, अशी जहरी टीका शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खा. संजय राऊत यांनी केली आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची संजय राऊत यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
यावेळी संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदेंच्या घरात बाळासाहेब ठाकरेंचा नाही तर अमित शाह यांचा फोटो हवा. आता जे बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावून फिरत आहेत त्यांनी त्यांच्या देवघरात अमित शाह यांचा फोटो लावला पाहिजे. कारण त्यांचे दैवत अमित शाह आहेत. पुढे बोलताना ते म्हणाले की, आमचा पक्ष आणि चिन्ह चोरण्याचे आणि आमचा पक्ष शिंदेंना देण्याचे काम अमित शाहांनी केलेले आहे. मात्र, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात. मग अमित शाह आणि नरेंद्र मोदी हे अमृत पिऊन आलेले नाहीत, असा इशारादेखील राऊत यांनी दिला आहे.
हरलो म्हणजे पक्ष संपत नाही
आगामी महापालिका निवडणूकीसाठी आम्ही तयार आहोत, सरकारने हिंमत दाखवली पाहिजे. आगामी निवडणुकीसाठी आम्ही तयारी सुरू केली आहे. येणार्या काळात फक्त नाशिकच नव्हे, तर अनेक जिल्ह्यात बदल होतील. काही जण मोहासाठी दुसर्या पक्षात जात आहेत. मात्र, ती खरी शिवसेना नाही. विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, कुणीच राजकारणातून संपत नाही, असे राऊत म्हणाले.
महायुतीने दोन गोष्टीचे आभार मानले पाहिजे. काळा पैसा आणि ईव्हीएम मशीनचे. कारण राज्यातील निकाल संशयास्पद आहे. निवडणूक आयोगाशी हातमिळवणी करून पक्ष ताब्यात घेतले. आमचा पक्ष आणि चिन्ह चोरण्याचे आणि आमचा पक्ष शिंदेंना देण्याचे काम अमित शाहांनी केलेले आहे. मात्र, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात. मग अमित शाह आणि नरेंद्र मोदी हे अमृत पिऊन आलेले नाहीत.
– खा. संजय राऊत