कोलाड शाखेतर्फे आर्थिक साक्षरता मेळावा संपन्न
| खांब-रोहा | वार्ताहर |
सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना आर्थिक पाठबळ देत त्यांच्या कुटुंबाचा विकास घडवून आणण्यात आरडीसीसी बँक यशस्वी ठरत आहे. घरदार सांभाळून काहीतरी करण्याची जिद्द असलेल्या सामान्य कुटुंबातील महिलांना बँकेने सहकार्याचा हात देत त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रीय कृषी ग्रामीण विकास बँक नाबार्ड आणि आरडीसीसी बँक कोलाड शाखेच्या संयुक्त विद्यमाने नुकताच महिलांसाठी आर्थिक साक्षरता मेळावा संपन्न झाला. यावेळी मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला होता.
दरम्यान, आर्थिक कमकुवत परिस्थिती असलेल्या, मात्र काहीतरी करण्याची जिद्द असलेल्या महिलांना छोटेखानी कर्जपुरवठा करून त्यांना व त्यांच्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून विविध सोयीस्कर योजनांद्वारे महिलांना कर्जपुरवठा करण्याच्या विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत, अशी माहिती कोलाड शाखा येथे संपन्न झालेल्या आर्थिक साक्षरता शिबिराप्रसंगी कोलाड शाखाधिकारी भावना सरफले यांनी दिली.
महिला वर्गाने स्वकर्तृत्वावर स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःचा व्यवसाय निर्माण करून उदरनिर्वाहाचे साधन निर्माण करावे, तर बचत गटातील महिलांनीदेखील सक्रीय होऊन छोट्या व्यवसायापासून प्रारंभ करून आपापला उदरनिर्वाह करावा, असे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रीय कृषी ग्रामीण विकास बँक नाबार्ड व रा.जि. मध्यवर्ती सह. बँक अलिबाग कोलाड शाखा यांच्या सहकार्याने आपण व्यवसायासाठी भांडवल उपलब्ध करून दिले जाईल, असे सांगतानाच महिला सक्षमीकरणासाठी शासनाकडून राबविल्या जात असलेल्या उपक्रमांचा वेळोवेळी फायदा करून घ्यावा, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी रोहा पं.स. माजी सदस्या चेतना लोखंडे, सेवानिवृत्त शिक्षिका शकुंतला खंडेलोट, संपदा परबळकर, अनिता मांडवकर, कोलाड शाखेचे सर्व कर्मचारी वृंद व आंबेवाडी ग्रा.पं. हद्दीतील विविध महिला बचत गटाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सदस्यांनी उपस्थिती नोंदवून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.