। अलिबाग । प्रतिनिधी ।
वाहतूकीचे नियम मोडणार्या चालकांविरोधात रायगडच्या वाहतूक पोलिसांनी कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी व गुरुवारी या दोन दिवसांच्या कालावधीत 523 चालकांविरोधात कारवाई करीत त्यांच्याकडून चार लाख 23 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात दिवसेंदिवस औद्योगिकीरणाबरोबरच पर्यटन वाढत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प जिल्ह्यात उभे राहत आहेत. तसेच पर्यटनामुळे वेगवेगळ्या लहान मोठ्या वाहनांची वर्दळ जिल्ह्यात वाढली आहे. जिल्ह्यात अनेकजण विना हेल्मेट, विना परवाना वाहन चालवित आहेत. त्यामुळे अपघात होऊन जखमी होण्याबरोबरच मृत्यू होण्याचा धोका वाढला आहे. हा धोका टाळण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेच्या मार्फत जिल्ह्यातील महामार्गासह नाक्या नाक्यावर वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्या चालकांविरोधात कारवाईची मोहिम त्यांच्या मार्फत केली जात आहे.
जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचार्यांनी दोन दिवसाच्या कालावधीत 523 वाहन चालकांविरोधात कारवाई केली. बुधवारी(दि.20) रोजी झालेल्या कारवाईत 170 जणांकडून एक लाख 39 हजार रुपयांचा तर व गुरुवारी (दि.21) रोजी 353 चालकांकडून दोन लाख 83 हजार 900 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.







