| अलिबाग | प्रतिनिधी |
जूलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने जोरदार बरण्यास सुरुवात केली आहे. रायगडमध्ये दोन दिवस रेड अलर्टचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहवे असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये जूलै महिन्यात अतिवृष्टीमुळे पुरपरिस्थिती आणि दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडतात. दरवर्षी या कालावधीत मोठी वित्तहानीबरोबरच जिवीतहानी होते. यावर्षी जूलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने जोर धरला होता. मात्र तो फार काळ राहिला नाही. कधी ऊन कधी पाऊस अशी परिस्थिती या महिन्यामध्ये होती. भात लावणीची कामे सुरू असताना शेतांमध्ये पाणी नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. लावणीची कामे लांबणीवर जाण्याची भिती निर्माण झाली होती. अखेर सोमवारपासून पावसाने पुन्हा सुरुवात केली आहे. मंगळवारी रात्रीदेखील पाऊस सूरूच राहिला. बुधवारी देखील पावसाची संततधार सुरूच होती.
जिल्ह्यामध्ये तीन दिवस मुसळधार पाऊस पडणार आहे. गुरुवारी (दि. 24), शुक्रवारी (दि.25)असे दोन दिवस रेड अलर्ट तसेच शनिवारी(दि. 26) ऑरेंज अलर्टचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या कालावधीत पुरपरिस्थिती, दरड कोसळण्याच्या घटना घडण्याची भिती व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात 300 अपदा मित्र आहेत. 392 दरडग्रस्त आणि 136 पुरग्रस्त भागांमध्ये या आपदा मित्रांची मदत घेतली जाणार आहे. पुराच्या वेळी पाण्यात अडकलेल्या नागरिकांना काढण्यासाठी 14 रबरी बोटींची व्यवस्था केली आहे. 91 अलर्ट सिस्टीम, वातावरणातील बदलत्या हवामानाची माहिती उपलब्ध होण्यासाठी 60 स्वयंचलित हवामान केंद्र, पर्जन्यमापक यंत्र 60, सेटेलाईट फोन 20 उपलब्ध करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
कुंडलिकेने ओलांडली इशारा पातळी
रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. रात्रीपासून पडलेल्या पावसाने धरणे नदी पाण्याने तुडूंब भरून गेल्या आहेत. जिल्ह्यामध्ये एकूण 747.6 मिमी व सरासरी 46.73 मिमी इतका एका दिवसात पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे.जिल्ह्यातील सावित्री, अंबा, कुंडलिका, पाताळगंगा, उल्हास व गाढी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात जलसाठा निर्माण झाला आहे. या पावसात कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे त्यामुळे नदीकिनारी असणाऱ्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
