| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर पश्चिम रेल्वेच्या दक्षता विभागाने 12 तासांहून अधिक काळ तपासणी करून ही मोठी कारवाई केली. पार्सल व्हॅनमध्ये लपवलेल्या चंदनाचे प्रकरण उघडकीस आले. तपासणी दरम्यान 93 किलो लाल चंदन जप्त करण्यात आले, ज्याची बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. तस्करांनी जयपूर-मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या भाडेतत्त्वावरील पार्सल व्हॅनमधून चंदन वाहतूक करण्याचा प्रयत्न केला होता. लाल चंदनाची तस्करी करणाऱ्या टोळ्यांनी रेल्वेमार्ग सुरक्षित असल्याचे गृहीत धरून हा मार्ग निवडला होता. परंतु, रेल्वे सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या सतर्क तपासामुळे त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. जयपूरहून मुंबईकडे येणाऱ्या पार्सल व्हॅनमधील सामानांची बारकाईने तपासणी करण्यात आली आणि त्यातून तस्करीचे हे प्रकरण उघड झाले. या प्रकरणी संबंधित तस्कराला ताब्यात घेण्यात आले असून, त्याची चौकशी सुरू आहे.