। रेवदंडा । महेंद्र खैरे ।
ताई, केवळ तुमच्यामुळेच…! हे आभाराचे शब्द सध्या तिचे नित्याचेच्. अनेकजणी रस्त्यात, बाजारात, कधी घरी येऊन भेटतात. तिने दिलेल्या ज्ञानानेच, प्रशिक्षणानेच संसारगाडाला स्वावलंबी जीवनाला गती मिळाली, हे आभार मनाच्या कप्पातून ती भेटताच बाहेर येतात. व्यवसायात यश मिळविण्यापेक्षा महिलांना रोजगारांची संधी मिळावी, म्हणून प्रशिक्षणाचा मार्ग स्विकारणार्या चौल चंपावती गल्ली येथील रेखाताई घरत यांना आभाराच्या शब्दात मोठे समाधान प्राप्त होते.
चौल चंपावती येथील रेखाताई घरत, पंचक्रोशीत विशेषतः महिलावर्गात लोकप्रिय आहेत. शिवणकला क्लासच्या माध्यमातून प्रशिक्षणाद्वारे अनेक मुलींना व महिलांना टेलरिंगमध्ये प्रशिक्षित करून रोजगार मिळवून दिले. यामध्येे अनेक गरीब, गरजू, निरक्षर महिलांना शिवणकला प्रशिक्षण देऊन आर्थिक उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध केला. वास्तविक नुसते टेलरिंग व्यवसाय करून स्वत: साठी ते चांगल्यापैकी उत्पन्न मिळवू शकत होत्या, परंतु स्वार्थ न ठेवता दुसरा महिलांना सुध्दा टेलरिंग व्यवसायातून उत्पन्न मिळावे, मुली व महिला स्वावलंबी बनाव्या या हेतूने त्यांनी चक्क टेलरिंग प्रशिक्षणाचा मार्ग स्विकारून असंख्य महिलांना टेलरिंग प्रशिक्षण दिले.
रेखाताई घरत यांचे सासर व माहेर चौल मधीलच, बारावीपर्यंतचे शिक्षण पुर्ण झाल्यावर विवाहीत जीवनास सुरूवात झाली, मात्र मुलीच्या जन्मानंतर नोकरी करणं शक्य नसल्याने नोकरी सोडावी लागली. परंतु घरात स्वस्थ बसणं त्यांना आवडले नाही, यामधूनच वेळ साधून त्यांनी सन 2001 मध्ये शिवणकला शिकण्याचा निर्णय घेतला. यासाठी कुटुंब व पती यांचे मोठे सहकार्य व जीजी-दादांचे आशिर्वादाने ते शक्य झाले. पुढे शिवणकला कला अवगत करून व्यवसायास प्रारंभ करून आर्थिक उत्पन्न निर्माण झाल्याने स्वावलंबी बनण्याचा आनंद घेतला.
घरात राहून शिवणकला व्यवसायातून तिला आर्थिकतेचा मार्ग मिळाला, या मार्गानेच इतर महिलांना सुध्दा व्यवसाय साधता यावा, यासाठी रेखाताई घरत यांनी चक्क शिवणकला प्रशिक्षण वर्ग सन 2002 सालापासून सुरू केले. अनेक मुलींना व महिलांना शिवणकला कामाचे प्रशिक्षण देवून स्वतंचे टेलरिंग व्यवसायासाठी तयार केले. दरम्यान मुंबई व पुणे येथे कापडी ज्युट बॅग, नऊवारी शिवणे, यांचे प्रशिक्षण घेतले. जेणेकरून विविध कला आत्मसात करून इतर स्थानिक महिलांना प्रशिक्षित करणे व त्यांना रोजदारी उपलब्ध करून देणे हा त्यातील मुख्यः उद्देश होता. दरम्यान जनशिक्षक संस्थान रायगडच्या संपर्कात आल्याने वारली पेटींग, ग्लास पेटींग, व इतर कला आत्मसात करून इतर महिलासाठी प्रशिक्षण व व्यवसाय दोन्ही सुरू ठेवले. स्वतंचे घरीच सकाळी अकरा ते सायकांळी साडेसहा वाजेपर्यंत त्यांनी प्रशिक्षण क्लासेस सुरू केले.
अनेक गरजू महिलाना पैशाची अपेक्षा न करता मोफत शिक्षण दिले. काही निरक्षर महिलांना सुध्दा चित्रांच्या माध्यमातून त्यांनी प्रशिक्षण दिले. त्यांनी शिवणकला प्रशिक्षण दिलेल्या असंख्य महिला स्वावलंबी बनून स्वतंचे पायावर उभे असल्याचा त्यांना निश्चित अभिमान आहे. दरम्यान शासनाच्या स्किल इंडिया योजनेअंतर्गत मुलींना मोफत प्रशिक्षण मिळवून देण्यात त्या यशस्वी झाल्या. कोव्हिड-19 जागतिक महामारीत सर्वत्र व्यवसाय ठप्प झाले असताना, शिवणकला प्रशिक्षण बंद झाले, परंतू शिवणकलेच्या माध्यमातून दोन, चार ग्रामपंचायतीचे 1000 मास्क बनविण्याची संधी मिळाली. त्यांनी स्वतंसह बचतगटातील प्रशिक्षीत महिला व विदयार्थी यांना सुध्दा माक्स बनविण्याचा व्यवसाय मिळवून देत अठठेचाळीस हजार माक्स निर्मिती केली. त्यांनी दिलेल्या या योगदानाने भारत सरकारने दखल घेवून त्यांना कौशल्याचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.