| राकेश खराडे | संतोषी म्हात्रे |
रात्रीच्या अंधारात कोसळलेल्या डोंगराने आपल्या कवेत घेतलेल्या इर्शाळवाडीतील अनेक घरे उद्ध्वस्त होत यामध्ये राहणारी माणसे, प्राणी, पक्षी हे सर्व मातीमध्ये गाडले गेल्यामुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. पहिल्या दिवशी संध्याकाळपर्यंत 106 लोक जिवंत असल्याचा पुरावा जिल्हा प्रशासनाला मिळाला होता, तर या दुर्दैवी घटनेत 16 लोकांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले होते. शुक्रवारी दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता हे सर्च ऑपरेशन सुरू होणार होते. मात्र, सतत पडणारा पाऊस व दाट धुके यामुळे हे सर्च ऑपरेशन आठ वाजता सुरू करण्यात आले. वेगवेगळ्या सामाजिक संस्था या एनडीआरएफच्या जवानांच्या सोबतीने मातीच्या मलब्याखाली दडलेल्या लोकांना शोधण्याचे काम करत होत्या. त्यांच्या प्रयत्नाला सहा शव शोधण्यात यश मिळाले असले तरी या परिसरात आता दुर्गंधी पसरू लागली आहे. त्यामुळे हे सर्च ऑपरेशन पुढे किती वेळ चालू राहील याबाबत काही सांगता येत नाही.
खालापूरचे तहसीलदार आयुब आंबोळी, खालापूर पोलीस निरीक्षक बाळा कुंभार, खोपोलीतून नुकतेच बदली होऊन गेलेले पोलीस निरीक्षक शिरिष पवार, आरोग्य यंत्रणा, एनडीआरएफ या जवानांसह अन्य सामाजिक संस्था या कामात जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या नेतृत्वाखाली मदत करीत आहेत. इर्शाळगडाच्या खालच्या बाजूचा कडा वेगळा होता. हा कडा इर्शाळवाडीतील दोन्ही बाजूंची घरे घेऊन खाली आला. या वाडीतील मुलीचं सात ते आठ घरे तशीच राहिली. मात्र, दोन्ही बाजूंची घरे रात्रीच्या अंधारात गायब झाल्याचे पहायला मिळते. आज सकाळी जसे सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले तशी लोकांची गर्दी हे पाहण्यासाठी वाढू लागली होती. मात्र, योग्य पध्दतीने नियोजन केल्यामुळे कोसळलेल्या डोंगर भागाकडे किंवा बचावलेल्या घराकडे बघ्यांना पाठविले जात नसल्याने काम करणाऱ्यांना त्यांचा अडथळा निर्माण होत नव्हता. शोधकार्य करणाऱ्या जवानांना चिखल व पावसाचा व्यत्यय येत होता खरा, मात्र हे सर्व जवान आपले काम प्रामाणिकपणे करताना दिसून आले.
दरडग्रस्त परिसरात औषध फवारणी
दरड कोसळून मोठी दुर्घटना घडल्याची घटनेला जवळपास 40 तास ओलांडून गेले असून, अनेक मृतदेह 15 फूट ढिगाऱ्याखाली आडून पडल्यामुळे परिसरात दुर्गधी पसरली आहे. त्यामुळे खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनुप दुरे यांनी स्वच्छता विभागीची संपूर्ण टिम दोन दिवसापासून मदतकार्य करीत असतानाच इर्शाळगड दरडग्रस्त ठिकाणी औषध फवारणी केली आहे. इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या नानीवाडी येथे संपूर्ण प्रशासनाची लोक तळ ठोकून बसले आहेत.दरडग्रस्त भागातील लोकांनी जि.प शाळेत ठेवण्यात आले असून याठिकाणी तसेच गावात औषध फवारणी,ब्लीचिंग पावडर गावातील रस्त्यावर टाकण्यात आली आहे. गावातील स्वच्छता राखण्यासाठी नगरपरिषदेच्या वतीने सर्व मदत करणार असल्याची माहिती मुख्याधिकारी,प्रशासक अनुप दुरे यांनी दिली आहे.