। अलिबाग । प्रतिनिधी ।
मिळकतखार येथील सरपंचासह दोन सदस्यांनी शासकीय जागेत अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधकाम केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी ग्रामसेवकाकडे चौकशी अहवाल गटविकास अधिकारी यांनी मागितला आहे. अनेक महिने होत आले तरीही तो अद्याप देण्यात आला नसल्याची माहिती पंचायत समितीकडून उपलब्ध झाली आहे. त्यामुळे अहवाल देण्यास ग्रामविकास अधिकारी टाळाटाळ करीत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
गोरख कडवे, अभिजीत कडवेसह तिघांनी अलिबाग तालुक्यातील मिळकतखार येथील वनविभागाच्या मिळकतीमध्ये अतिक्रमण करून त्या ठिकाणी सिमेंट विटांचे बांधकाम केल्याचा आरोप जगदीश म्हात्रे यांनी केला आहे. त्यांना दंडात्मक नोटीस बजावण्यात आल्या आहेत. गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. सदस्य व सरपंचपद रद्द करण्याची मागणी म्हात्रे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. निवडणुकीच्या कालावधीत दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्रामध्ये व सोबत जोडलेले प्रतिज्ञापत्र आणि हमीपत्र आदी कागदपत्रांमध्ये चुकीची माहिती दिली असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
या तक्रारीची दखल घेत प्रशासनाने गटविकास अधिकारी यांच्याकडून अहवाल मागविला आहे. गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून ग्रामसेवक यांना पत्र देऊन अहवाल देण्याची मागणी केली. परंतु, अनेक महिने उलटून गेले आहेत, तरीदेखील ग्रामसेवकाने हा अहवाल गटविकास अधिकारी यांच्याकडे पाठविला नसल्याची माहिती पंचायत समिती कार्यालयाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात ग्रामसेवक अहवाल देण्यास टाळाटाळ का करीत आहे, असा प्रश्न तक्रारदारांकडून उपस्थित केला जात आहे.
मिळकतखार येथील सरपंच व सदस्य यांच्या विरोधात लेखी तक्रार दाखल झाली आहे. त्याचा अहवाल ग्रामसेवकाकडून मागविण्यात आला आहे. अद्याप अहवाल प्राप्त झाला नाही. अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कार्यवाही केली जाईल.
दाजी दाईंगडे,
गटविकास अधिकारी, अलिबाग