सार्वजनिक बांधकाम खात्यातील भ्रष्टाचाराने परिसीमा गाठली
| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यातील सार्वजनिक बांधकाम खात्यात आर्थिक भ्रष्टाचाराची परिसीमा गाठली असून, त्याची मजल मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयापर्यंत गेली आहे. त्याची पोचपावती खुद्द या खात्याचे मंत्री अशोक चव्हाण यांनी विधानसभेत दिली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या क्रीम पोस्टिंग मानल्या जाणार्या मुंबई सर्कलचे तत्कालीन अधीक्षक अभियंता नाना पवार यांच्या चौकशीचे आदेश माजी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. सरकार बदलल्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये हा विभाग माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे आला, त्यामुळे पवार यांच्या चौकशीची फाईल आली असता त्यांनी ती मान्यतेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेसाठी पाठवली, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी या चौकशीला मान्यता देऊन ती फाईल पुन्हा अशोक चव्हाण यांच्याकडे पाठवली. ती फाईल बघताना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शेर्याच्या बाजूला कंसात नाना पवार यांचे नाव चौकशीतून वगळावे, असा शेरा लिहिलेला चव्हाण यांच्या निदर्शनास आला, तेव्हा चव्हाण यांना हा शेरा संशयास्पद वाटला म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असता कंसातला शेरा नंतर कोणीतरी लिहिला असल्याचे समजले. त्यामुळे याविरुद्ध तातडीने विभागातर्फे मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार करण्यात आली. याचा तपास पोलीस करीत असल्याचे मंत्री अशोक चव्हाण यांनी विधानसभेत चर्चेदरम्यान सांगितले. त्यावेळी सभागृहातील सदस्य अवाक् झाले.