महसूल विभागाकडून सक्तीचे भूसंपादन
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
पेंधर गावाजवळ सिडकोकडून बांधण्यात येणार्या उड्डाणपुलाच्या कामातील मुख्य अडथळा दूर झाला आहे. जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने दोन वर्षे रखडलेले भूसंपादन सक्तीचे भूसंपादन प्रक्रिया प्रांतअधिकारी राहुल मुंडके यांनी पूर्ण केली. यामुळे उड्डाणपुलाच्या कामास गती येणार आहे.
तळोजा नोडमध्ये वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी सिडकोकडून पेंधर गावाजवळ पनवेल मुंब्रा महामार्ग आणि पनवेल दिवा लोहमार्गांवर उड्डाणपुल बांधण्याचे नियोजन आहे. लोहमार्गांजवळ आलेल्या काही तांत्रिक अडथळ्यामुळे उड्डाणपुलाच्या नकाशात बदल करावे लागले. ही प्रक्रिया पुर्ण करण्यास बराच कालावधी गेल्यामुळे उड्डाणपुलाचे काम रखडले होते. सिडकोने केलेल्या पाठपुराव्यामुळे हा अडथळा दूर झाला, परंतू सिडकोच्या जागेत असलेल्या हॉटेलच्या अतिक्रमणामुळे तळोजा बाजूकडे उड्डाणपुलाचे काम पुर्ण होवूनही खारघरबाजूकडे काम अर्धवट अवस्थेत होते.
सर्व्हे नंबर 99 आणि 97 येथील एकूण 38 गुंठे जागेवर अतिक्रमण होते. या जागेत दोन भावांचा वाद असल्यामुळे संबंधित जागेचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. सिडकोकडून जागा संपादन करून जागेचा मोबदला सुमारे 88 लाख रूपये ठरविण्यात आला आहे. जागामालकाने अतिक्रमण हटविले नव्हते. त्यामुळे प्रांतअधिकारी राहूल मुंडके यांना जिल्हाधिकार्यांकडून भूसंपादन अधिकारी म्हणून नेमणूक करून अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे प्रांताधकार्यांनी सक्तीचे भूसंपादन कायद्याखाली संबंधित हॉटेलचे अतिक्रमण जमिनदोस्त केले. मंडल अधिकारी संतोष कचरे यांच्या पथकाने नुकतीच ही कारवाई केली.
अनेक वर्षे रखडलेले काम या कारवाईमुळे मार्गी लागणार आहे. पनवेल मुंब्रा महामार्ग आणि पनवेल दिवा लोहमार्गांवर उड्डाणपुल पुर्ण होण्यास गती येईल असे सिडकोकडून सांगितले जात आहे. तुर्तास हा पुल खारघरला जोडला जाणार नाही, परंतू महामार्गांला जोडला गेल्यास तळोजा फेज वन, सेक्टर 40 परिसरातील नागरिकांना रेल्वे फाटकावर तासनतास ताटकळत उभे राहण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे महसूल विभागाने केलेले सक्तीचे भूसंपादन सिडकोच्या विलंब झालेला प्रकल्प लवकर पुर्ण होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.