| उरण | वार्ताहर |
गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्याआधी येथील खड्डेमय झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी रायगडभूषण, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. एल.बी.पाटील यांनी केली आहे. यासाठी नवघर येथील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येत याबाबतचे निवेदन सिडकोला दिले. नवघर एसटी स्टँड ते नवघर गावापर्यंत तसेच नवघर, नवघरपाड्यापासून भेंडखळकडे जाणार्या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्याबाबत नवघर गावातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची एल.बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 23 ऑगस्ट रोजी बैठक झाली. यावेळी द्रोणागिरी सिडको ऑफिस बोकडवीरा, उरण येथे नवघर गावाच्या आजूबाजूच्या रस्त्यांची खड्डेमय परिस्थिती सिडको अधिकार्यांच्या निदर्शनात आणून देऊन योग्य तो निर्णय घेण्यास भाग पाडू, असा निर्णय नवघर गावातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी या बैठकीत घेतला. त्या अनुषंगाने सिडकोचे वरिष्ठ अधिकारी एच.डी. नहाने यांच्याशी फोनवर बोलून नवघर खड्डेमय रस्त्यांची सविस्तर परिस्थिती सांगितली. याबाबत तात्काळ अॅक्शन घेत सिडकोचे अधिकारी इंजिनिअर जयेश तांडेल यांना घेऊन सदर खड्डेमय रस्त्यांची पाहणी केली. तसेच गणेशोत्सवपूर्वी खड्डे बुजविण्यात येतील, असे आश्वासन दिले.
यावेळी भाजपचे जयप्रकाश मधुकर भोईर, शिवसेनेचे अविनाश म्हात्रे, ग्रामस्थ मंडळ नवघर अध्यक्ष जयप्रकाश पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे नेते विश्वास तांडेल, ग्रामपंचायत सदस्य गणेश वाजेकर, योगेश तांडेल, ज्ञानेश्वर भोईर, पत्रकार मनोहर भोईर आदी सर्वपक्षीय कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.