चेंढरे ग्रामपंचायतीचा महावितरणला इशारा
भुयारी विद्युत वाहिनीमुळे रस्त्यांची दुरवस्था
I अलिबाग I विशेष प्रतिनिधी I
चेंढरे ग्रामपंचायत हद्दीत भुयारी विद्युत वाहिनीच्या कामामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याबाबत आठ दिवसात निर्णय घेऊन रस्त्यांची दुरुस्ती न केल्यास भुयारी विद्युत वाहिनीचे काम बंद पाडू, असा इशारा विद्युत वितरण विभागाला चेंढरे ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन महावितरणच्या अधिकार्यांना माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, सरपंच स्वाती पाटील, उपसरपंच यतीन घरत, माजी उपसरपंच परेश देशमुख, संदीप ढवळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिले.
या निवेदनानुसार ग्रामपंचायत चेंढरे हद्दीमध्ये राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत भूमीगत विद्युत वाहिन्या टाकण्याचे कामाकरिता 12 जानेवारी 2018 रोजी ग्राम पंचायतीने नाहरकत दाखला दिला होता. सदर नाहरकत दाखल्यामधील शर्ती-अटीनुसार भूमीगत विद्युत वाहिन्यांचे काम वेळेवर पूर्ण करणे, तसेच रस्ते नव्याने दुरुस्ती करणे आवश्यक होते. परंतु, सदरील काम आजतागायत प्रलंबित असल्याने ग्रामपंचायत हद्दीतील बहुतांशी रस्ते अत्यंत खराब अवस्थेत झालेले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी ग्रामपंचायतीकडे येत आहेत. सदरील भूमीगत विद्युत वाहिन्या टाकण्याचे काम प्रलंबित असल्याने ग्रामपंचायतीमार्फत किंवा जिल्हा परिषद, पंचायत समिती फंडांतर्गतदेखील सदरील रस्ते दुरुस्ती अथवा नव्याने तयार करता येत नाहीत, याबाबत म.रा.वि.वि कंपनी कार्यकारी अभियंता यांना 18 डिसेंबर 2020 रोजी पत्राद्वारे कळविण्यात आलेले आहे.
मात्र, याबाबत कोणतीच हालचाल करण्यात आलेली दिसत नाही. त्यामुळे भूमीगत विद्युत वाहिन्यांचे ग्रामपंचायत चेंढरे हद्दीतील प्रलंबित असलेले काम तातडीने पूर्ण करुन रस्ते दुरुस्तीचे काम करण्यात यावे व याबाबत लेखी स्वरुपात ग्रामपंचायतीस कळविण्यात यावे, अन्यथा सदर काम थांबविणे किंवा कसे याबाबत ग्रामपंचायत पुढील योग्य तो निर्णय घेईल व त्याकरिता होणार्या परिणामास आपण पूर्णत: जबाबदार राहाल, असा इशारा ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता सादिक इनामदार, सहाय्यक अभियंता पंकज जाधव हे उपस्थित होते. तर ग्रा.पं. सदस्य प्रशांत फुलगावकर, रोहन राम पाटील, ममता मानकर, लीना आंबेतकर, अनिता शेंडे, विनोद दळवी, मिथुन बेलोस्कर, सचिन म्हात्रे, अजित माळी आदींचा या शिष्टमंडळात समावेश होता.