मानसरोवर रेल्वे स्टेशन वाहनांच्या विळख्यात

स्थानकाबाहेरील वाहनतळ, पदपथावर थाटली दुकाने

। पनवेल । प्रतिनिधी ।

हार्बर रेल्वे मार्गांवरील मानसरोवर रेल्वे स्थानकात सध्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. स्थानकातील छतावर बसवण्यात आलेले जुने आणि जीर्ण झालेले पत्रे बदलून त्या ठिकाणी नवे पत्रे बसवण्याचे तसेच स्थानक परिसरात रंगरंगोटी करण्याचे काम हाती घेण्यात आले असून, पत्रे बदलण्यात येत असल्याने पाणी गळती होऊन प्रवाशांना पावसाळ्यात होणारा त्रास काहीसा कमी होण्याची शक्यता आहे.

सिडको आणि रेल्वेच्या माध्यमातून मानसरोवर रेल्वे स्थानक विकसित करण्यात आले आहे. 2008 साली उदघाटन करण्यात आलेल्या या रेल्वे स्थानकामुळे काही मिनिटातच मुंबई तसेच मुंबई उपनगरातील शहर गाठणे शक्य होत असल्याने कामोठे वसाहतीमध्ये घर खरेदी करण्याला पसंती दिली जात आहे. परिणामी कामोठे वसाहतीमधील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून, मनसरोवर रेल्वे स्थानकातून प्रवास करणार्‍यांची संख्यादेखील दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच रेल्वे स्थानकाला खेटूनच प्रधानमंत्री आवास योजनेचे काम सुरु असल्याने स्थानकात जाणारी वाट बिकट झाली आहे. आवास योजनेच्या कामासाठी पूर्वी वाहनतळासाठी वापरात असलेले भूखंड वापरण्यात आल्याने स्थानक परिसरात जागा मिळेल तिथे वाहन उभी केली जात आहेत. यामुळे स्थानकाला वाहनांचा विळखा पडल्याचे पाहायला मिळत आहेत. स्थानकाच्या आवारात सध्या उपलब्ध असलेल्या वाहन तळात खाद्य पदार्थांची तसेच इतर दुकाने थाटण्यात आली आहेत. तसेच, रेल्वे स्थानकाच्या बाहेर उपलब्ध असलेल्या सार्वजनिक शौचालायला लागूनच खाद्यपदार्थ विक्री केली जात असून, शौचालयाच्या काही भागाचा वापर फेरीवाल्यांकडून साहित्य ठेवण्यासाठी केले जात आहे.

पाण्याच्या टाक्यांवर सफाईची तारीख नाही
रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवर पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, या ठिकाणी पाणी साठवण्यासाठी वापरात असलेल्या टाक्यांची सफाई कधी करण्यात आली याची माहितीच टाकीवर टाकण्यात आलेली नाही.

Exit mobile version