| अलिबाग | वार्ताहर |
अलिबाग- वडखळ मार्गावर शनिवारी (दि.24) सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. महिन्याचा चौथा शनिवार, रविवार या सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-पुण्याच्या पर्यटकांनी अलिबाग मुरुडकडे धाव घेतली आहे. तसेच दोन तीन दिवसांपासून लग्नसमारंभ मोठ्या प्रमाणात असल्याने लग्नासाठी जाणाऱ्या वऱ्हाडी मंडळींची मार्गावर गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे, यामुळे लग्नाला जाणाऱ्या मंडळींची मुहूर्तावर पोहोचण्याचा खटाटोप सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी रस्त्यावर झाल्याने दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असल्याने इच्छित स्थळी लवकर पोहोचण्यासाठी काही वाहनचालकांनी हलगर्जीपणा करत अगोदरच अरुंद असलेल्या रस्त्यावर डबल लाईन केल्यामुळे जागोजागी वाहतूक ठप्प झाली आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पेझारी नाका वगळता पोयनाड पासून धरमतर पर्यंत फक्त एकच वाहतूक पोलीस कर्मचारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपस्थित असल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडून गेली आहे. आजारी रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला मार्ग काढताना दमछाक होत आहे. काही मिनिटांच्या प्रवासाला दोन ते तीन तासांपेक्षा जास्त वेळ लागत असल्याने सगळ्यांनाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.