शिवाजी शिंदे यांचे आगारप्रमुखांना निवेदन
| माथेरान | वार्ताहर |
माथेरानमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गैरसोय होऊ नये यासाठी माथेरान-कर्जत मिनीबस वेळापत्रकात बदल करावा, असे निवेदन विद्यार्थ्यांच्या वतीने माथेरानचे माजी नगरसेवक शिवाजी शिंदे यांच्या पुढाकाराने कर्जत आगारप्रमुखांना देण्यात आले.
माथेरानमधील स्थानिक रहिवासी आणि विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मिनीबसच्या कर्जत-माथेरान अशा पाच फेर्या नियमित सुरू आहेत. या फेर्यांच्या वेळापत्रकानुसार माथेरान येथून सकाळी 7.30 वाजता मिनीबसची पहिली फेरी सुटते. या सकाळच्या फेरीमध्ये माथेरानमधील सुमारे 40 हून अधिक विद्यार्थी आपल्या शिक्षणासाठी नेरळ, कर्जत, खोपोली, बदलापूर येथे महाविद्यालयात शिक्षणासाठी नियमित प्रवास करीत आहे; परंतु यांच्या महाविद्यालयाची वेळ सकाळी सात वाजताची असल्याने विद्यार्थी महाविद्यालयात पोहोचण्यास विलंब होतो. आणि, त्यामुळे विद्यार्थ्यांचे सकाळचे दोन सत्र चुकत असून, याचा त्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत असून, अभ्यासात मागे पडत आहेत.
यामध्ये येथील अनेक विद्यार्थ्यांचे पालक काबाडकष्ट करून कसेबसे आपल्या मुलांचे उच्च शिक्षण पूर्ण करण्याचे स्वप्न साकार करीत आहेत. याकरिता या डोंगराळ भागातून प्रवास करून उच्च शिक्षणासाठी संघर्ष करीत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी त्याच्या शिक्षणासाठी होणारी अडसर लक्षात घेता माथेरान येथून सकाळी 7.30 वाजता सुटणारी पहिली मिनीबसच्या वेळापत्रकात बदल करून ही बस जुन्या वेळापत्रकानुसार सकाळी 6.15 वाजता सोडण्याची व्यवस्था करावी, असे निवेदनात नमूद केले आहे. माजी नगरसेवक शिवाजी शिंदे यांच्या पुढाकाराने कर्जत आगार प्रमुखांना (दि.9) निवेदन देण्यात आले. यावेळी शिंदेंबरोबर विद्यार्थीदेखील उपस्थित होते.