रेस्क्यू टीमची प्रांतांनी थोपटली पाठ
| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव काळ नदीपात्रात पाण्याच्या प्रवाहात पुरुष जातीचा मृतदेह वाहत जात असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर माणगाव पोलिसांनी नदी किनारी शोध घेण्याचे काम सुरु केले होते. त्यानंतर त्यांनी तत्काळ माणगाव येथील साळुंके रेस्क्यू टीमला बोलावण्यात आले. त्यानंतर पोलीस, रेस्क्यू टीम व लोणशी ग्रामस्थांनी नदी पात्रात शोधमोहीम गतिमान केली. त्यावेळी लोणशी येथील काळ नदीत मगरीचा संचार असणाऱ्या ‘डेंजर झोन’ म्हणून परिचित असणाऱ्या भागात हा मृतदेह तरंगत असल्याचे दिसले. परंतु, त्या मृतदेहाजवळच दोन मगरी रेस्क्यू टीमला दिसून आल्या. त्यामुळे या इसमाचा मृतदेह बाहेर काढण्याचे आव्हान या टीमपुढे उभे होते. या टीमने धाडस करून तो मृतदेह बाहेर काढला होता.
या घटनेची माहिती माणगाव पोलिसांनी रेस्क्यू टीमला देऊन बोलावले होते. त्यानुसार माणगाव मंडळ निरीक्षक अर्जुन जमखंडी, तसेच रेस्क्यू टीमचे माणगाव अध्यक्ष रवी मोरे, महाराष्ट्र रेस्क्यू टीमचे उपाध्यक्ष इमरान ढवलारकर, ऋषिकेश मोरे, रफिक जामदार, सुमित साळवी तसेच लोणशी ग्रामस्थ, माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील व सर्व कर्मचारी यांनी शोधमोहीम राबवून तपास घेतला होता. लोणशी गावाजवळील काळनदीत आणखी तीन नद्यांचा संगम आहे. त्या ठिकाणी नदीचे मोठे पात्र असून, तेथे मगरीचा संचार आहे. त्यामुळे तो परिसर डेंजर झोन म्हणून ओळखला जातो. त्याठिकाणी इसमाचा मृतदेह बाहेर काढताना दोन मगरी रेस्क्यू टीमच्या निदर्शनास आल्यानंतर या टीम पुढेही मोठे आव्हान उभारले होते. मात्र, धाडसी टीमने हा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले होते. याची माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप यांना समजताच त्यांनी माणगाव तहसील कार्यालयात रेस्क्यू टीमच्या धाडसी सदस्यांचा सत्कार करीत पाठ थोपटली. त्यावेळी माणगाव तहसीलदार विकास गारुडकर, मंडळ निरीक्षक अर्जुन जमखंडी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.