दीर्घकाळानंतर उपाययोजनांसाठी प्रयत्न सुरु
। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी उन्हाळ्यात पर्यटकांची गर्दी असते. उन्हाळा असल्याने पाण्याचा वापरदेखील अधिक प्रमाणात करावा लागतो. त्यामुळे पर्यटन हंगामात पाण्याचा तुटवडा भासू नये, यासाठी नागरपरिषद आग्रही आहे. माथेरान पालिकेचे नगराध्यक्ष शहरात पिण्याचे पाणी व्यवस्थित आणि मुबलक यावे, यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्याचवेळी माथेरानकरांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी संपुष्टात येण्यासाठी ठोस उपाययोजना आवश्यक आहेत; त्या सर्व उपाययोजना दीर्घकाळ असाव्यात, यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
दरवर्षी माथेरानमध्ये उन्हळ्यात पिण्याच्या पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. तसे यावर्षी देखील पाण्याच्या गहन समस्येला स्थानिकांना सामोरे जावे लागल्याने जीवन प्राधिकरणबाबतीत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. सातत्याने कमी दाबाने पाणीपुरवठा तसेच अन्य समस्यांच्या अडचणी निर्माण होत असल्याने पाण्याचा पुरवठा नियमितपणे होत नव्हता. कधी जुंमापट्टी येथील पंपिंग बंद असायची, तर कधी वॉटर पाईप येथील पंपिंग हाऊसमध्ये तांत्रिक बाबी निर्माण व्हायच्या. त्यामुळे येथील शारलोट तलावातील पाण्याचा उपसा करण्यात आला होता. परिणामी शारलोट तलावाची पाण्याची पातळी कमी झाली असून या तलावात अगोदरच दहा ते पंधरा फूट मातीचा गाळ साचलेला आहे. पावसाळ्यात नेरळ येथून होणारी पाण्याची पंपिंग बंद असते, तरीसुद्धा बिल भरमसाठ आकारले जात असल्याचे ग्राहकांकडून बोलले जात आहे.
सद्यस्थितीत शहरात असलेल्या पर्यटकांना पिण्याच्या पाण्याची कुठेही गैरसोय निर्माण होऊ नये, यासाठी नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी लक्ष ठेवून आहेत. नगराध्यक्ष चौधरी यांनी स्वतः अनेकदा या तीनही पंपिंग हाऊसवर भेटी देत पाहणी करून संबंधित अधिकारी वर्गाला कर्मचाऱ्यांना तांत्रिक बाबी दूर करण्यासाठी सूचित केले होते. त्यामुळे काही काळ पाण्याची समस्या काहीशा प्रमाणात दूर झाली होती. परंतु, कुंभे याठिकाणी जवळपास सहा फूट खोलवर पाण्याचा पाईप फुटला होता, त्यामुळे माथेरानला पाणी येऊ शकले नाही. याकामी पुन्हा एकदा नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी आणि कार्यक्षम मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी कुंभे येथे जाऊन माहिती घेतली असता पाईप लाईन फुटली असून ती ताबडतोब दुरुस्त करून घेण्यात आली. त्यामुळे यापुढे माथेरानकरांना मुबलक पाणी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर हा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी संपुष्टात आणण्यासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
कुंभे, जुंमापट्टी आणि वॉटर पाईप येथील पंपिंग हाऊसवर जीवन प्राधिकरणामार्फत एक-एक पंप आणून ठेवला आहे. जर एखादा पंप बिघडल्यास दुसऱ्या पंपद्वारे पाण्याचा पुरवठा केला जाऊ शकतो. त्यामुळे नागरिकांना पाण्याची समस्या उद्भवणार नाही. पर्यटन हंगाम हे केवळ लक्ष्य नाही, तर पुढील काळात अखंडित पाण्याचा पुरवठा व्हावा, यासाठी आमचे प्रयत्न सुरु राहतील.
– चंद्रकांत चौधरी,
नगराध्यक्ष, माथेरान
