। चिपळूण । वार्ताहर ।
महिलांनी विविध क्षेत्रात नेत्रदिपक प्रगती साध्य केलेली असून पुरुषाच्या बरोबरीने काम करण्याची तयारी महिलांनी जिद्द व चिकाटीच्या जोरावर ठेवलेली आहे. म्हणूनच आपला देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. प्रतिकूल परीस्थितीवर मात करुन पुरुषाच्याबरोबरीने आपली प्रगती आजची महिला साध्य करत आहे हे उल्लेखनिय आहे असे प्रतिपादन विद्यालयाचे रफिक मोडक यांनी केले.
महिला दिनानिमित्त सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय महिलांनी विविध क्षेत्रात साध्य केलेल्या प्रगती विषयी उल्लेखनीय माहिती देणार्या भित्तीपत्रकाचे उद्घाटन उमा देसाई याच्या हस्ते करण्यात आले. आर्या कदम, दुहिता घोलाकर, संचीता कदम यांनी महिलांचे आजचे कर्तृत्व याविषयावर विविध दाखल्यांच्या आधारे माहिती दिली. या कार्यक्रमाला उद्धव तोडकर, विजय चव्हाण, सर्व महिला कर्मचारी, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचिता कदम यांनी तर आभार प्रदर्शन शिल्पा राजेशिर्के यांनी केले.