‘जागर आपल्या संस्कृतीचा’ कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद

। उरण । प्रतिनिधी ।

उरण तालुक्यातील बांधपाडा खोपटे ग्रामपंचायततर्फे आजपर्यंत जनतेच्या कल्याणासाठी विविध योजना, सवलती मोठया प्रमाणात राबविण्यात आल्या. सर्व योजनांची ग्रामपंचायतने अंमलबजावणीसुद्धा केली. महिलांची आर्थिक स्थिती सुधारावी, त्यांचे राहणीमान सुधारावे, महिलांच्या उन्नतीस हातभार लागावा या अनुषंगाने अनेक उपक्रम बांधपाडा खोपटे ग्रामपंचायत मार्फत राबविण्यात आले. महिलांचे मनोरंजन व्हावे व त्यांच्यातील कला गुणांना वाव मिळावा, विविध कौशल्य त्यांनी आत्मसात करावे या दृष्टीकोनातून खोपटे ग्रुप ग्रामपंचायत मार्फत महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्या सर्वांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हळदीकुंकू समारंभ, महिला सक्षमीकरण कार्यक्रम, महिलांसाठी आरोग्य शिबिर इत्यादी कार्यक्रम मोठ्या संख्येने आयोजित करण्यात आले. आणि यावर्षी प्रथमच महिलांसाठी ’जागर आपल्या संस्कृतीचा’ या कार्यक्रमा अंतर्गत महिलांना आपल्या दररोजच्या कामातून विरंगुळा मिळावा ह्या उद्दिष्टाने ग्राम पंचायतमार्फत महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यात पारंपरिक नृत्य, गाणी आणि नाटिका यांचे अतिशय उत्तम प्रकारे सादरीकरण करण्यात आले. सदर कार्यक्रमात महिलांचे मनोधर्या वाढावे यासाठी सरपंच विशाखा ठाकूर यांनी स्वतः दोन धार्मिक गाण्याच्या नृत्यातून सक्रिय सहभाग घेतला.

Exit mobile version