रोह्यात लोक अदालतीस प्रतिसाद

चार जोडप्यांचा संसार पुन्हा जुळला


| नागोठणे | वार्ताहर |

रोहा न्यायालयातील लोक अदालतीमध्ये दाखल व वादपूर्व प्रकरणे ठेवून ती तडजोडीने मिटविण्याचे आवाहन पक्षकारांना करण्यात आले होते. त्यास पक्षकारांनी चांगला प्रतिसाद दिल्याने एकूण 3952 प्रकरणांपैकी 1211 प्रकरण सामंजस्याने व तडजोडीने मिटवून निकाली काढण्यात आली. त्यामधून एकूण 49 लाख, 49 हजार, 686 रुपयांची वसुली झाल्याने रोहातील लोक अदालतीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे पहावयास मिळाले. तसेच या लोक अदालतीमध्ये चार जोडप्यांचा वाद मिटविण्यात आला असून त्यांच्या संसाररुपी वेळीवरचे फुल पुन्हा एकदा फुलल्याचे यावेळी पहावयास मिळाले.

रोहा येथील कनिष्ठ स्तर दिवाणी व फौजदारी न्यायालयात 9 डिसेंबरला संपन्न झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आलेल्या दिवाणी व फौजदारी प्रलंबित असलेल्या 1479 खटल्यांपैकी 437 खटल्यांतून 39 खटले तडजोडीने निकालात काढण्यात आली. यामधून 15 लाख 56 हजार, 16 रुपये एवढी रक्कम तडजोडीअंती जमा झाली. तसेच या लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आलेल्या दाखलपूर्व वाद खटले म्हणजेच रोहा नगरपरिषद, तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी, राष्ट्रीयकृत बँका, पतसंस्था, बीएसएनएल, एमएसईबी यांच्याकडील एकत्रित 3515 प्रकरणांपैकी 1172 प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात येवून त्यामधून 33 लाख, 93 हजार, 670 रुपये रक्कम वसूल करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई., जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अलिबाग-रायगड यांच्या निर्देशानुसार व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. राजंदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. रोह्यातील या लोक अदालतीमध्ये कक्षप्रमुख म्हणून सह न्यायाधीश एम.सी. हासगे यांनी तर पंच म्हणून ॲड. स्मिता कुथे यांनी काम पाहिले. यावेळी रोहा नगरपरिषदेचे अधिकारी, ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक, राष्ट्रीयकृत बँका, पतसंस्था, बीएसएनएल, एमएसईबीचे प्रतिनिधी आदींसह पक्षकार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही लोकअदालत यशस्वी होण्यासाठी रोहा न्यायालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Exit mobile version