| नागोठणे | वार्ताहर |
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अलिबाग-रायगड यांच्या निर्देशानुसार रोहा तालुका विधी सेवा समितीतर्फे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन रोहा येथील कनिष्ठ स्तर दिवाणी व फौजदारी न्यायालयात शनिवार दि. 9 सप्टेंबरला करण्यात आले होते. रोहा येथील कनिष्ठ स्तर दिवाणी व फौजदारी न्यायालयातील राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आलेल्या दिवाणी व फौजदारी प्रलंबित असलेल्या खटल्यांपैकी 442 खटल्यांतून 84 खटले तडजोडीने निकालात काढण्यात आली.
यामधून 22 लाख 25 हजार, 801 रुपये एवढी रक्कम तडजोडीअंती जमा झाली. तसेच या लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आलेल्या दाखलपूर्व वाद खटले म्हणजेच रोहा नगरपरिषद, तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी, राष्ट्रीयकृत बँका, पतसंस्था, बीएसएनएल, एमएसईबी यांच्याकडील एकत्रित 5048 प्रकरणे तडजोडीकरिता लोकन्यायालयात ठेवण्यात आली होती. त्यापैकी 821 प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात येवून त्यामधून 38 लाख, 24 हजार, 231 रुपये रक्कम वसूल करण्यात आली. या प्रसंगी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश एस.एस.महाले, अॅड. प्रतिक्षा पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिले. यावेळी अॅड. नानासाहेब देशमुख, अप्पर तहसीलदार प्रकाश म्हेत्रे, वकील वर्ग, रोहा नगरपरिषदेचे अधिकारी, ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक, राष्ट्रीयकृत बँका, पतसंस्था, बीएसएनएल, एमएसईबीचे प्रतिनिधी आदींसह पक्षकार उपस्थित होते.