। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव नगरपंचायत हद्दीतील वाकडाई नगराचे सुपुत्र भरती सैन्य दलातून 17 वर्ष देशसेवा करून सेवानिवृत्त झालेले कमांडो जयेश जयसिंग सुर्वे यांचे शनिवारी (दि.2) माणगाव नगरीत वाजत गाजत जोरदार स्वागत करण्यात आले. या मिरवणुकीत कमांडो जयेश सुर्वे यांचे स्वागत करण्यासाठी माणगावकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
भारतीय सैन्य दलात आपले कर्तव्य बजावून देशाची प्रामाणिकपणे 17 वर्षे सेवा करून सैन्यदलातून सेवानिवृत्त झालेले कमांडो जयेश जयसिंग सुर्वे यांचा स्वागत सोहळा व सैनिक मिरवणूक कार्यक्रम शनिवारी वीर यशवंतराव घाडगे माजी सैनिक संघटना माणगाव – तळा, युवा निलेश थोरे मित्र मंडळ माणगाव, युवा क्रिकेट क्लब माणगाव यांनी आयोजित केला होता. माणगाव बस स्टॅन्ड ते कचेरी रोड मार्गे वीर यशवंतराव घाडगे स्मारक ते वाकडाई नगरापर्यंत वाजत गाजत कमांडो जयेश सुर्वे यांची मिरवणूक काढण्यात आली. वीर यशवंतराव घाडगे स्मारक ठिकाणी आल्यावर कमांडो जयेश सुर्वे यांनी वीर यशवंतराव घाडगे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर वाकडाई नगरपर्यंत हि मिरवणूक पुढे नेण्यात आली. वाकडाई नगर येथे आल्यावर जयेश सुर्वे यांचे वाकडाई नगर ग्रामस्थांनीही जोरदार स्वागत केले. माणगावच्या सुपुत्राने 17 वर्ष देशसेवा करून माणगावचे नाव सर्वदूर पोहचविल्याने त्याचे माणगावकरांनी खास अभिनंदन करीत त्यास शुभेच्छा दिल्या.