| पनवेल | वार्ताहर |
खारघर येथे राहणार्या सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाची भामट्यांनी तब्बल एक कोटी पाच लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. खारघर येथील सेक्टर 20 मधील ट्विन्स सोसायटीमध्ये 64 वर्षांचे जेष्ठ नागरिक राहतात. ते एका खासगी कंपनीच्या उपाध्यक्ष या पदावरुन सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी आयुष्यभरात कमावलेली रक्कम बँक खात्यात जपून ठेवली होती. संबंधित ज्येष्ठाला शेअर्स ट्रेडिंगमधून जास्तीचा नफा मिळवून देतो असे आमिष दाखवून विविध बँक खात्यात रक्कम गुंतविण्यास सांगितले. त्यांनी बँकेत जमा केलेली रक्कम भामट्यांनी तयार केलेल्या बनावट संकेतस्थळावर दर्शविण्यात आली. परंतु, ज्यावेळेस गुंतवलेली रक्कम काढण्यासाठी या जेष्ठ नागरिकाने प्रयत्न केला त्यावेळी ती रक्कम परत मिळाली नाही. नवी मुंबई पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.