रेवदंडा बसस्थानकाला तळ्यांचे स्वरूप

पहिल्याच पावसात दयनीय अवस्था; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

| रेवदंडा | प्रतिनिधी |

पहिल्याच पावसात अलिबाग तालुक्यातील रेवदंडा एस.टी. बसस्थानकाच्या आवाराची दयनीय अवस्था समोर आली आहे. यावेळी रेवदंडा स्थानक परिसरात ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून तळी निर्माण झाली आहेत. त्यामुळे प्रवासी, वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, संबंधित विभागाच्या दुर्लक्षाबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

रेवदंडा एस.टी. बसस्थानक हे अलिबाग, मुरूड आणि रोहा तालुक्यांना जोडणारे महत्त्वाचे मध्यवर्ती स्थानक आहे. येथून दररोज शेकडो प्रवासी विविध गावांसह मुंबई, पुणे, ठाणे, शिर्डी इत्यादी ठिकाणांसाठी प्रवास करतात. त्यामुळे बसस्थानक परिसरात दिवसभर मोठी वर्दळ असते. मात्र, बसस्थानकाच्या आवारातील रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खोल खड्ड्यांमुळे पावसाळ्यात पाणी साचून मोठ्या तळ्यांचे स्वरूप निर्माण झाले आहे. या खड्ड्यांमधून एस.टी. बसेस ये-जा करताना वाहनांना धक्के बसत असून, प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागत आहे. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात चालकांची कसरत होत असून, त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.

याशिवाय बसस्थानक परिसरात अनधिकृत आणि बेशिस्त वाहन पार्किंगची समस्या गंभीर बनली आहे. आवारात उभ्या राहणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांमुळे एस.टी. बसेसच्या हालचालींना अडथळा निर्माण होत आहे. खड्डे आणि अनधिकृत पार्किंग यांचे दुहेरी संकट बसस्थानकासाठी अपघाताचे निमंत्रण ठरत असल्याची भावना प्रवासी वर्गातून व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी बसस्थानकाच्या आवारातील रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून खड्डे बुजविण्याची, तसेच अनधिकृत पार्किंगवर नियंत्रण आणण्याची मागणी केली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच समोर आलेल्या या समस्येकडे संबंधित विभागाने तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

रेवदंडा बसस्थानकातून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. मात्र, आवारातील खड्डे आणि पाण्याची तळी पाहता प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत.

स्थानिक नागरिक
Exit mobile version