रस्त्यावरील प्रवास जीवघेणा
। अलिबाग । प्रतिनिधी ।
रेवदंडा – मुरूड मार्गावरील रस्त्याचे काम सुरु आहे. ठिकठिकाणी खोदकाम करून ठेवले आहे. मात्र, अवकाळी पावसात हा रस्ता खडड्यात गेला असून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या मार्गावरील प्रवास जीवघेणा होऊ लागला आहे. पावसाळ्या पूर्वी हा रस्ता झाला नाही तर या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्य पायाभूत रस्ते विकास महामंडळ अंतर्गत रेवदंडा ते मुरुड या मार्गावरील रस्त्याचे काम सुरू आहे. रुंदीकरण व काँक्रीटीकरण असे या रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्यासाठी करोडो रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. रेवदंडा चेकपोस्ट पासून काही अंतरापर्यंत रस्ता खोदून ठेवला आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना तारेवरची कसरत होत आहे. दरम्यान या रस्त्याचे काम उशीरा सुरू केले असताना सध्या संथ गतीने तसेच नियोजनाचा अभाव असलेल्या पद्धतीने काम केले जात आहे. सोमवारी (दि.21) पहाटे मुरुड तालुक्यात पाऊस पडला. या अवकाळी पावसात हा खोदलेला रस्ता पूर्णतः चिखलमय झाला आहे. येणारी जाणारी वाहने घसरून अपघात होण्याची भिती निर्माण झाली आहे. अवकाळी पावसात खड्डेमय रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेबाबत प्रवासी वर्गात प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.
