। पुणे । प्रतिनिधी ।
प्रवासी महिलेचा विनयभंग करुन पसार झालेल्या रिक्षाचालकाला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. शिवशंकर वैजनाथ परळीकर असे अटक करण्यात आलेल्या रिक्षाचालकाच नाव आहे. तक्रारदार महिला 24 जानेवारी रोजी हडपसर गाडीतळ परिसरातून रिक्षाने मांजरीकडे निघाली होती. सिरम कंपनीजवळ असलेल्या रस्त्यावर रिक्षाचालक परळीकरने रिक्षा थांबविली आणि महिलेशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरडाओरडा केल्यानंतर तो पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी तपास सुरू केला. हडपसर गाडीतळ ते मांजरी भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण पोलिसांनी तपासले. चित्रीकरणावरुन पसार झालेला रिक्षाचालक परळीकर याचा माग काढून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.