कर्जतचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांची घेतली भेट
। कर्जत । वार्ताहर ।
गुंडगे येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणारा घनकचरा प्रकल्प हटावा म्हणून घनकचरा प्रकल्प हटाव संघर्ष समिती गेल्या तीन वर्षापासून निवेदने देत आंदोलन करीत आहे. परंतु कर्जत नगरपरिषद प्रशासन या गंभीर समस्येकडे पाहिजे तेवढे गांभिर्याने घेत नसल्याने मुख्याधिकारी वैभव गारवे यांची समितीने भेट घेऊन प्रकल्प हटविण्यासंदर्भातील मुख्याधिकारी यांच्याकडून आढावा घेतला.
गुंडगे येथील सर्व्हे नंबर 60 मधील शासकीय जागेमध्ये घनकचरा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पामध्ये कचर्याचे डोंगर उभे राहिले असून, गुंडगे गाव तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे. या विरोधात गुंडगे परिसरातील नागरिकांनी कर्जत नगरपरिषदेच्या कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढला होता. त्याच बरोबर वेळोवेळी पत्र, निवेदने देण्यात आली होती. नुकत्याच 2024 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणूक मतदान प्रक्रियेवर देखील बहिष्कार टाकण्यात आला होता.
कर्जत नगरपरिषदेने सर्वसाधारण सभेमध्ये ठराव घेतला होता. त्यामध्ये असे नमुद करण्यात आले आहे की, दहिवली येथे आरक्षण क्र. 34 ची जागा कंपोस्ट पीट म्हणून आरक्षित करण्यात आली आहे. ही जागा विकसित करणे, संपादन करणेसाठी ही सभा वित्तीय मंजूरी देत आहे. परंतु 18 महिन्यानंतरही या विषयी कोणत्याही प्रकारची प्रक्रिया कर्जत नगरपरिषदेकडून झालेली दिसून आलेली नाही. याकरिता मुख्याधिकारी यांना समितीच्यावतीने पुन्हा लेखी निवेदन दिले होते. परंतु या निवेदनाला देखील मुख्याधिकारी यांनी कोणत्याच प्रकारचे उत्तर दिले नव्हते.
घनकचरा प्रकल्प हटाव संघर्ष समितीने कर्जत नगरपरिषदेच्या कार्यालयात जावून मुख्याधिकारी वैभव गारवे यांची भेट घेतली. त्यांना पुन्हा एकदा गुंडगे गाव परिसर समितीच्यावतीने निवेदन देण्यात आले. या भेटी दरम्यान मुख्याधिकारी गारवे यांनी सांगितले की, घनकचरा प्रकल्पातील कचरा संकलन, त्याचे वर्गीकरण, आणि हटविण्यासाठी काय प्रयत्न केले यांची लेखी स्वरुपातील माहिती आठ दिवसांमध्ये देण्याचे आश्वासन दिले. मुख्याधिकारी यांच्या लेखी आश्वासनाने जर समितीचे समाधान झाले नाही, तर समितीच्यावतीने पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घेतला जाणार आहे.