। ठाणे । प्रतिनिधी ।
ठाणे शहरात भटक्या श्वानांचा हैदोस वाढला असून दिवसाला जवळपास पाच जणांना कुत्रे चावा घेत असल्याचे समोर आले आहे. भटक्या श्वानांच्या चाव्यामुळे रेबीजची लागण होऊन व्यक्तीचा मृत्यू होतो. अशा मृत्यूचे प्रमाण शुन्यावर आणण्यासाठी ‘रेबीजमुक्त ठाणे’ अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये जवळपास सात दिवसांत दहा हजार कुत्र्यांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
ठाणे महानगरपालिका आणि मिशन रेबीज इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे महापालिका क्षेत्रात अभियान राबविण्यात येत आहे. रेबीजची लागण टाळून मानवी मृत्यू रोखणे तसेच, रेबीज विषाणूच्या प्रसाराचे चक्र तोडणे, यासाठी हे अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानात 29 जानेवारी ते 4 फेब्रुवारी या काळात भटक्या श्वानांचे रेबीज लसीकरण करण्याचे लक्ष्य निर्धारित केले असून गेल्यावर्षी सात हजाराहून अधिक श्वानांचे रेबीज लसीकरण करण्यात आले होते. या उपक्रमात, ठाणे सीपीसीए, इंडियन सोसायटी फॉर व्हेटनरी ऍनिमल प्रोटेक्शन, सिटीझन्स फॉर ऍनिमल प्रोटेक्शन, व्हीटीईएएमएस आणि पीएडब्ल्यू आशिया या संस्थाचे सहकार्य मिळणार आहे.
लसीकरणासाठी एकूण 25 पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात एक डॉक्टर आणि तीन कर्मचारी नेमण्यात आले आहेत. भटक्या श्वानांकडून चावा घेण्याचे प्रमाण जास्त असलेल्या भागांची माहिती शहरातील नागरिक तसेच’ प्राणी मित्रांकडून जमा करण्यात आली असून त्याआधारे विभागवार लसीकरण मोहिमेचे नियोजन केले आहे, अशी माहिती पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. क्षमा शिरोडकर यांनी दिली.