। चिरनेर । प्रतिनिधी ।
शनिवारी (दि.1) येणार्या माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने उरण तालुक्यातील ऐतिहासिक चिरनेर गावातील अत्यंत प्राचीन अशा श्री महागणपती मंदिरात येणार्या लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेऊन, मंदिर प्रशासनासह चिरनेर ग्रामस्थांनी भक्तांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे.
तालुक्यातील चिरनेर येथे अष्टविनायकासारखे श्री महागणपती हे प्रख्यात देवस्थान असल्याने येथील जागृत महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविक भक्तगण चिरनेर तीर्थस्थळी येत असतात. या सर्व भक्तगणांची गैरसोय होऊ नये, सर्वांना सुखकर सोयी सुविधा मिळून, रांगेत दर्शन घेता यावे, वाहतूक कोंडी होऊ नये, गणेश भक्तांना पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय व महाप्रसादाची व्यवस्था व्हावी, त्याचबरोबर कोणताही अनुचित व उत्सवाला गालबोट लागणारा प्रकार घडू नये, यासाठी कडक बंदोबस्त, तसेच चिरनेर गणपती देवस्थान प्रशासनाकडून आवश्यक व सुसज्ज असे नियोजन करण्यात आले आहे. अशी माहिती मंदिर प्रशासनाचे अध्यक्ष महेंद्र पाटील, उपाध्यक्ष मंगेश पाटील, सचिव अमर ठाकूर, खजिनदार संजय मोकल, विश्वस्त मंगेश पाटील यांनी दिली.
माघी गणेश जन्मोत्सव गुरुवारी (दि. 30) ते रविवार (दि.2) पर्यंत चालणार आहे. यात श्रींचा महाअभिषेक, महापूजा, जन्मोत्सव सोहळा, महाआरती, महाप्रसाद, श्रींची पालखी मिरवणूक, भजन, कीर्तन, भावगीते व भक्तीगीतांचे कार्यक्रम होणार आहेत. यात प्रामुख्याने पुण्याचे कीर्तनकार हर्षद जोगळेकर यांचे श्रींच्या जन्मोत्सवानिमित्ताने चार दिवस कीर्तन होणार असून, ललिताच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता होणार आहे. अशी माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आहे.