स्थलांतरितांच्या मुलांना हक्काचे शिक्षण;जिल्हा परिषदेचा स्तुत्य उपक्रम

शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वेक्षण मोहीम
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क अधिनियम 2009 नुसार 6 ते 14 वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण घेण्याचा हक्क आहे. त्यामुळे हंगामी स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यात 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर कालावधीत शिक्षण विभागामार्फत सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व जिल्हा शिक्षण अधिकारी प्राथमिक विभाग पूनिता गुरव यांनी दिली आहे.

ऊसतोड मजूर, दगडखान मजूर, वीट भट्टी कामगार, शेतमजूर, बांधकाम कामगार आदींचे व्यवसायाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते. या स्थलांतरात कुटुंबीयांबरोबर मुले देखील स्थलांतरित होत असतात. या स्थलांतरित मुलांचे शैक्षणिक नुकसान नुकसान टाळण्यासाठी जिल्ह्यात तीन ते अठरा वयोगटातील मुलांचा शोध घेण्यासाठी 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणात जिल्हाबाहेर स्थलांतरित होणारे विद्यार्थी तसेच इतर जिल्ह्यातून रायगड जिल्ह्यात येणारे स्थलांतरित विद्यार्थी यांची नोंद घेतली जाणार आहे.

स्थलांतरित विद्यार्थी राज्यातील कोणत्याही भागात गेले तरी त्यांना तेथील शाळेत प्रवेश मिळावा व शिक्षण पुढे सुरू राहावे, यासाठी अशा विद्यार्थ्यांना शिक्षण हमी कार्ड देण्याची तरतूद करण्यात आली असून, त्याद्वारे स्थलांतरित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात राहता येणार आहे. यासाठी व्यापक स्वरूपात सर्वेक्षण मोहीम राबवून प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. तरी 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर कालावधीत राबविण्यात येणार्‍या सर्वेक्षण मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकारी पूनीता गुरव यांनी केले आहे.

Exit mobile version