| कोर्लई | वार्ताहर |
अलिबाग-साळाव-मुरुड-आगरदांडा रस्त्याच्या डांबरीकरण कामात रस्त्यावर गतिरोधकांची संख्या शंभरपर्यंत वाढली आहे. या गतिरोधकांची काही ठिकाणी उंची वाढली असून, त्यांना चढ-उतार (स्लोप) नाही, ना काही ठिकाणी दर्शक फलक अथवा झेब्रा पट्टे नसल्याने वाहनचालकांची डोकेदुखी ठरत आहेत. आवश्यक असेल अशा ठिकाणी रस्त्यावर गतिरोधकांची संख्या कमी करत रंम्लिग स्ट्रिप बसवावेत, अशी मागणी नांदगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते मुअज्जम हसवारे यांनी केली आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील गतिरोधक हटवून अंतर्गत रस्त्यावर बसविण्याबाबत दि.22 सप्टेंबर 2023 रोजी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना एक निवेदन देण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राज्य, राष्ट्रीय, जिल्ह्यातील व तालुक्यातील महामार्गावर बर्याच ठिकाणी रस्त्यावर चढ-उतारावर असलेल्या गतिरोधमुळे वारंवार वेगमर्यादा कमी होऊन वाहन चालकांना व प्रवाशांना होणारा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
साळाव-मुरुड-आगरदांडा रस्त्याच्या डांबरीकरणानंतर रस्त्यावर गतिरोधकांची संख्या वाढली असून, गतिरोधकांसाठी दर्शक फलक, झेब्रा पट्टे नसल्याने तसेच त्यांना चढ-उतार (स्लोप) नसल्याने अक्षरशः वाहने आपटतात, त्यामुळे विशेष करून दुचाकी अपघाताची शक्यता लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने योग्य ती उपाययोजना करण्याची व काही ठिकाणी साईडपट्ट्या भरण्यात याव्यात, अशी मागणी मुअज्जम हसवारे यांनी केली आहे.