| रसायनी | वार्ताहर |
चौक गाव, बाजारपेठ येथे माकडांनी उच्छाद मांडला असून, ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. लहान मुले भीतीच्या सावटाखाली आहेत, त्यामुळे त्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी चौक येथील गृहिणी पूनम प्रभाकर चोगले यांनी वन विभागाकडे केली आहे.
फेब्रुवारी महिन्यापासून चौक परिसरात माकडांचा उच्छाद सुरूच असतो. गेली काही वर्षे हे नियमित घडत आहे. सध्या उन्हाळा अतिशय तापदायक असून, गर्मीचे प्रमाण वाढले आहे. त्यातच रोजच जंगलात वणवे लागत जात आहे. वाढत्या उन्हाळ्यात जंगलात पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे, त्यातच रोजच वणवे लागत असल्याने जंगलात लागणारी फळे नष्ट झाली आहेत. माकडांच्या आणि जंगली प्राण्यांच्या अधिवासात माणसांचा प्रवेश सुरू झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जंगलात सुखी आणि समृद्ध असलेली माकडाची जात वनचर, जंगली प्राणी हे माणसांच्या वस्तीकडे वळली आहेत असे दिसते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार या परिसरातील घरात शिरून कांदे, बटाटे, जेवण, भाजीपाला शोधून खातात, तसेच झाडांना लागलेली फळे, नारळ, चिकू खाऊन तोडून टाकतात, घराचा दरवाजा चुकून उघडा राहिल्यास घरातील सामानाची नासधूस मोठ्या प्रमाणात होते. कपडे, अंथरुण पळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. कौलारू घरे आणि पत्राची घरे यांचे नुकसान झाले आहे. या परिसरातील लहान मुले भीतीच्या सावटाखाली आहेत. भुकेमुळे खाण्यासाठी आणि तहान लागली म्हणून पाणी पिण्यासाठी येणारी माकडे रस्ता ओलांडताना त्यांचा अपघात होऊन मृत्यूदेखील झाले आहेत. वनविभागाने याकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन पूनम प्रभाकर चोगले यांनी केले आहे.