वन विभागाची थरारक कारवाई
| पाली/गोमाशी | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात शिकार्यांचा वावर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मंगळवारी (दि. 11) मध्यरात्री पुई गावच्या जंगल हद्दीतून देशी बनावटीची बंदूक वनविभागाच्या कर्मचार्यांनी थरारक कारवाई करत जप्त केली आहे. या बंदूकधारी इसमाचा वनविभागाच्या कर्मचार्यांनी पाठलाग केला. मात्र, कर्मचारी पडून जखमी झाल्याने अंधाराचा फायदा घेत तो व्यक्ती तेथून पसार झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की गुरुवारी (दि.13) होळीनिमित्ताने होळीच्या लाकडांसाठी जंगलतोड होऊ नये यासाठी वनक्षेत्रपाल विशाल सोनावणे व लिपिक संतोष भिंगारदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल उत्तम शिंदे, वनरक्षक कर्मचारी विनोद चव्हाण, संकेत गायकवाड, संदीप ठाकरे, नामदेव मुंडे, शिवानी शिंदे व प्रियांका तरडे यांचा सहभाग असलेले वन विभागाचे गस्ती पथक मंगळवारी रात्री सुधागड तालुक्यातील पुई गावाच्या परिसरात गस्त घालत होते. अचानक गस्ती पथकाला टॉर्चचा प्रकाश दिसला. मध्यरात्रीच्या सुमारास टॉर्चचा प्रकाश दिसल्याने गस्ती पथकाचा संशय वाढला. गस्ती पथकातील कर्मचारी विनोद चव्हाण, संकेत गायकवाड व संदीप ठाकरे उजेडाच्या दिशेने डोंगरावर जंगलात पुढे गेले. कोणाला संशय येऊ नये म्हणून त्यांनी बॅटरी लावल्या नाहीत. अंधारात पडतझडत पुढे गेल्यावर ते दोन दिशांना विभागले. विनोद चव्हाण व संकेत गायकवाड एका बाजूला गेले तर, संदीप ठाकरे एका बाजूला गेले. मोबाईलची रेंज गेली होती. अशावेळी छोट्या टेकडीच्या अडोशाला व जमिनीवर आडवे पडून विनोद चव्हाण व संकेत गायकवाड हे कर्मचारी लपले. तेवढ्यात समोरून तो बंदूकधारी व्यक्ती आला त्याने वनविभागाच्या कर्मचार्यांना पाहिले आणि घाबरून हातातील गावठी बनावटीची बंदूक व बॅटरी तेथेच टाकून तो पळू लागला. वनविभाग कर्मचारी विनोद चव्हाण व संकेत गायकवाड यांनी त्याचा पाठलाग केला. मात्र, अंधार असल्याने ते खाली पडून जखमी झाले आणि तो बंदूकधारी तेथून पसार झाला.
या प्रकारानंतर वन विभागाच्या अधिकार्यांनी तो शिकारी असावा असा अंदाज काढला आहे. याचा मुख्य पुरावा म्हणजे सापडलेली बंदूक. सुधागड तालुक्यात जंगल आहे. या जंगलात शिकार केली जात असावी. या संशयातून आता बंदूक जप्त करून तो शिकारी कोण, याचा शोध वन विभागाने सुरू केला आहे.