। पुणे । प्रतिनिधी ।
लोणी काळभोर भागात एका शेतात अफुची लागवड करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी शुक्रवारी (दि.14) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास छापा टाकून शेतकरी महिलेला अटक केली आहे.
पुणे-सोलापूर रस्त्यावर म्हातोबाची आळंदी गाव आहे. जगताप मळा रस्त्यावर मंगल दादासाहेब जावळकर (45) हिची जागा असून या जागेत अफुची लागवड करण्यात आल्याची माहिती लोणी काळभोर पोलिसांना सूत्रांकडून मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकून कारवाई केली. पोलिसांनी केलेल्या पाहणीत तेथे अफुची 66 झाडे लावण्यात आल्याचे उघडकीस आले. त्याचे वजन चार किलो असून त्याची बाजारामध्ये अंदाजे 40 हजार रुपये किंमत आहे. याप्रकरणी मंगल जावळकर या महिलेला अटक केली असून तिच्याविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.