अंबा नदीला पूर, नागोठणे पाण्यात

बसस्थानकासह शहरातील सखल भागात पाणीच पाणी

| नागोठणे | वार्ताहर |

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्यासह नागोठणे परिसराला अक्षरशः झोडपून काढले असतानाच गेले दोन-चार दिवसांपासून दुथडी भरून वाहणाऱ्या नागोठण्यातील अंबा नदीने बुधवारी (दि.19) पहाटे 2.30 वाजण्याच्या सुमारास धोक्याची पातळी ओलांडली. यानंतर अगदी काही तासांतच नागोठणे अंबा नदीच्या काठावरील सकल भागातील एसटीस्थानक, आठवडा बाजार, छत्रपती शिवाजी महाराज चौक व बाजारपेठ, बंगले आळी, श्री मरिआई मंदिरा समोरील मिनिडोअर रिक्षा स्टँड व श्री मरिआई मंदिर परिसर, नागोठणे कोळीवाडा, हॉटेल लेक व्ह्यूसमोरील परिसरात यावेळी पूराचे पाणी शिरले.

नागोठणे परिसरातून शिक्षणासाठी नागोठणे येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांची यावेळी तारांबळ उडाल्याचे दिसून आले. याचबरोबर यावेळी परिसरातील जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांनाही याचा फटका बसला. या आलेल्या पुरामुळे एस.टी.स्थानकात येणाऱ्या गाड्यांना काही काळ नागोठणे येथील मुंबई गोवा महामार्गावर थांबावे लागले होते. तसेच पूर आलेल्या परिसरातील सर्वांनाच या पुराच्या परिस्थितीचा सामना करावा लागला.

नागोठणे परीसरात पावसाचा जोर कायम असल्याने पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ होत असल्याने याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप पोमन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नारायण चव्हाण हे पोलीस कर्मचाऱ्यांसह पाणी आलेल्या ठिकाणी उपस्थित होते. तसेच नागोठणे ग्रामपंचायत प्रशासक सुनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसेवक राकेश टेमघरे व कर्मचारीही यावेळी पूर आलेल्या ठिकाणी उपस्थित राहून नागरिकांना सूचना देत होते. महसूलचे नागोठणे मंडळ अधिकारी भरत गुंड, नागोठणे तलाठी गणेश विटेकर, वरवठणे तलाठी दिलीप खंडारे हे देखील यावेळी पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.

नागोठण्याची पुरपरिस्थिती नियंत्रणाखाली ठेवण्याकरिता तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नागोठणे पोलीस ठाण्याचे कर्मचारी व ग्रामपंचायतीचे कर्मचारी पूर आलेल्या ठिकाणी उपस्थित राहून नागरिकांना वेळोवेळी सूचना करत आहेत. त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे.

नागोठण्याची पुरपरिस्थिती नियंत्रणाखाली ठेवण्याकरिता तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नागोठणे पोलीस ठाण्याचे कर्मचारी व ग्रामपंचायतीचे कर्मचारी पूर आलेल्या ठिकाणी उपस्थित राहून नागरिकांना वेळोवेळी सूचना करत आहेत. त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे.

– संदीप पोमन, सहाय्यक पोलीस निरीक्षक, नागोठणे

कोणतीही अघटीत घटना घडू नये यासाठी या सर्व भागातील विद्युत पुरवठा तात्काळ बंद करण्यात आला असून, माझ्यासह नागोठणे कार्यालयातील विद्युत कर्मचारी पूर परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहेत. विद्युतपुरवठा बंद करण्यात आलेल्या भागातील नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावे.

नितीन जोशी, कनिष्ठ अभियंता, नागोठणे महावितरण
Exit mobile version