नेरळ-कळंब 25 नोव्हेंबरला रस्ता रोको

। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील सर्वाधिक खराब समजला जाणारा रस्ता म्हणून नेरळ- कळंब रस्त्याचे नाव आघाडीवर असते. या रस्त्याची दुरुस्ती आणि नव्याने डांबरीकरण करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.25 नोव्हेंबर रोजी मनसेचे कार्यकर्ते नेरळ- कळंब रस्ता रोखणार आहेत.
माथेरान-नेरळ-कळंब या राज्यमार्ग रस्त्यातील नेरळ रेल्वे फाटक ते पोही फाटा या 12 किलोमीटर अंतरावरील रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. चार वर्षपूर्वी या रस्त्यावर चार कोटी रूपयाचा निधी खर्च करण्यात आला होता. मात्र ठेकेदार कंपनीने केलेल्या नित्कृष्ट कामामुळे या रस्त्याची अवस्था दोन वर्षात दयनीय झाली आणि आज या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य असून मागील दोन वर्षांपासून दुचाकी पासून चारचाकी वाहनाना खड्डे चुकवतच प्रवास करावा लागत आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सार्वजनिक बांधकाम विभाग कडून नेरळ-कळंब या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आणि नव्याने डांबरीकरण करण्याच्या मागणीसाठी आक्रमक बनली आहे.निवेदने देऊन देखील सार्वजनिक बांधकाम विभाग कोणत्याही प्रकारची हालचाली करीत नसल्याने मनसे आक्रमक झाली आहे. बांधकाम खात्याच्या विरोधात मनसेने 25 नोव्हेंबर रोजी रस्ता रोको आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनांत स्थानिक नागरिक,विविध गावातील ग्रामस्थ आणि प्रवासी वाहतूक करणारे वाहनचालक यांनी सहभागी व्हावे असे आवाहन मनसेचे कर्जत तालुका अध्यक्ष महेंद्र निगुडकर, यशवंत भवारे, अकबर देशमुख यांनी केले आहे.

Exit mobile version