खड्डेमय रस्ता सोडून प्रशासनाचे हात वर; सावळे ग्रामस्थांचा संताप अनावर
| नेरळ | प्रतिनिधी |
पंतप्रधान येणार म्हणून सुस्थितीत असलेला रस्ता खोदला; मात्र दौरा रद्द होताच ग्रामस्थांना त्याच खड्डेमय रस्त्यावर सोडून प्रशासनाने हात वर केले आहेत. कर्जत तालुक्यातील सावळे ग्रामस्थांना या मनमानीचा मोठा फटका बसत असून, रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. सावळे फाटा ते कमान या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अन्यथा लाखाची वाडी येथील जमीन सपाटीकरणाचे काम सुरू करू देणार नाही, असा पवित्रा घेत ग्रामस्थांनी काम बंद पाडले.
कर्जत तालुक्यातील टोरंट वीज प्रकल्पाच्या भूमीपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याने लाखाची वाडी येथे जमीन सपाटीकरणाचे काम सुरू आहे.
हेलिपॅड ते कार्यक्रमस्थळापर्यंत जाण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या कामाची निविदा काढली. मात्र, निविदा प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच सावळे गावाकडे जाणारा रस्ता खोदून ठेवण्यात आला. त्यानंतर महिनाभर उलटूनही रस्त्याचे काम झाले नाही. पंतप्रधानांचा दौरा रद्द झाला, मात्र ग्रामस्थांच्या वाट्याला खोदलेला रस्ता आला. प्रशासनाच्या या कारभारामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी थेट कामाच्या ठिकाणी धडक देत सपाटीकरणाचे काम बंद पाडले. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेक दुचाकीस्वार घसरून पडले असून, एका महिलेलाही दुखापत झाली आहे. मंजुरी नसताना रस्ता खोदला कशासाठी, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी येऊन आंदोलनाबाबत ग्रामस्थांना सूचना केल्या.
रस्त्याच्या कामासाठी साडेतीन लाखांचा निधी मंजूर असून, निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या दोन दिवसांत ठेकेदार निश्चित होऊन कामाला सुरुवात होईल.
राहुल देवांग,
उपअभियंता, सा.बां. विभाग
आमची मागणी साधी आहे. सावळे फाटा ते कमान हा रस्ता तयार करून द्यावा. त्यानंतरच लाखाची वाडी येथील सपाटीकरणाचे काम सुरू करावे. आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही; मात्र आमच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्षही सहन करणार नाही.
बाजीराव दळवी,
ग्रामस्थ
