संरक्षक भिंतींमुळे माथेरानचे रस्ते मजबूत

मुसळधार पावसातही जनजीवन सुरळीत

। नेरळ । प्रतिनिधी ।

मुसळधार पाऊस पडूनही माथेरानमधील रस्ते सुरक्षित असून, येथे गॅबियन पद्धतीने करण्यात आलेली संरक्षक भिंतीची कामे उपयुक्त ठरत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे भर पावसातही येथील जनजीवन रस्ता सुरळीत सुरु राहिले आहे.

माथेरानला दरवर्षी सरासरी 3500 मिलीमीटर पाऊस होतो. यावर्षी पावसाने 5000 मिमीचा टप्पा सप्टेंबर महिन्याच्या अर्ध्यावर असताना गाठला. माथेरानसारखा पाऊस डोंगरावर वसलेल्या पर्यटनस्थळांवर देखील झाला आहे. काश्मीर, हिमालयात झालेल्या पावसाने तर तेथील रस्ते वाहून जाण्याच्या घटना घडल्या आहेत. माथेरानसारख्या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस होऊन केवळ रस्त्यावरील क्ले पेव्हर वाहून गेले आहेत. मात्र रस्ता कुठेही वाहून गेला नाही. त्यामुळे माथेरानमधील जनजीवन सुरळीत राहण्यास मदत झाली. ठराविक दिवशी तर सलग प्रचंड प्रमाणात मुसळधार पाऊस होऊनही त्याचा परिणाम रस्त्याच्या मजबुतीकरणाला बाधा आणणारा ठरला नाही आणि त्यामुळे पावसाचा परिणाम रस्त्यांवर झाला नाही.
माथेरानमधील जमिनीची धूप हा सर्वात मोठा अडथळा येथील विकास प्रक्रियेत असतो. त्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. कापडी बारदाने बांधून देखील मातीची धूप थांबली नव्हती. याची अनेक उदाहरणे असताना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी रेल्वे मार्गात यशस्वी ठरलेला गॅबियन प्रयोग राबविला. शहरातील ज्या रस्त्यांची कामे केली जात आहेत, त्या ठिकाणी मातीची धूप होण्याची स्थिती असेल तर गॅबियन वॉल बांधली जात आहेत. त्याचे चांगले परिणाम माथेरानमध्ये दिसून येत आहेत.

माथेरानमध्ये शासनाचा नगरविकास विभाग तसेच पर्यटन आणि पर्यावरण विभागाकडून मोठा निधी आला आहे. त्यातून बनविण्यात येणारे क्ले पेव्हर ब्लॉकचे रस्ते आणि एमएमआरडीएने सुशोभीकरण केलेली प्रेक्षणीय स्थळे तसेच मुख्य रस्त्याच्या बांधणीमध्ये मातीची धूप होऊ नये यासाठी गॅबियन वॉल मोठ्या प्रमाणात उभारल्या आहेत. पॅनोरमा पॉईंट, मायरा पॉईंट,एको पॉईंट तसेच हार्ट पॉईंट येथे सुशोभिकरण करताना रस्त्यांची सुधारणा हा मुख्य उद्देश ठेवून गॅबियन वॉलचे संरक्षण देण्यात आले आहे.

महात्मा गांधी रस्त्याचे पर्यावरणपूरक मजबुतीकरण करण्यात आले आहे. चार किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर दगडाने मजबुतीकरण आणि नंतर त्यावर क्ले पेव्हर ब्लॉकची मात्रा यशस्वी ठरली आहे. हा अधिक लांबीचा रस्ता अतिवर्गाने आणि ढगफुटी सदृश पाऊस होऊनही वाहून गेला नाही. त्याचे कारण गॅबियन वॉलमुळे रस्ता सुस्थितीत असल्याचे दाखले देत आहेत. या रस्त्यावर जागोजागी आणि दरीकडील बाजूला रस्त्याचा आकार वाढविण्याचा प्रयत्न करताना गॅबियन वॉलचे जाळे बसविण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्याचे आयुष्य वाढले; परंतु रस्त्याचे रुंदीकरणदेखील झाले आहे. नव्याने केलेली कामेदेखील मजबूत आणि प्राधिकरणच्या अधिकार्‍यांच्या देखरेखीखाली झाली असल्याने देशातील असंख्य डोंगर भागातील रस्ते वाहून गेले असताना माथेरानमधील सर्वच रस्ते सुस्थितीत आहेत. त्यामुळे गॅबियन वॉलचे संरक्षण माथेरानमधील रस्त्यांसाठी वरदान ठरले आहे.

ठेकेदारांवर कारवाई होणार का?
माथेरानमध्ये काही ठिकाणी नव्याने बनविलेल्या रस्त्यामधून पाण्याचे लोट वाहताना स्थानिकांनी पाहिले आहे. त्या-त्या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे दोन तीव्र उताराच्या रस्त्यांवर पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग न बनविणार्‍या ठेकेदारांवर शासकीय यंत्रणा कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

माथेरानमधील रस्त्यांसाठी गॅबियन वॉल बनविण्यात आल्यामुळे वाचले आहेत. आता पावसाळा संपत आला आहे. मात्र भविष्यात हे सर्व रस्ते अधिक काळ टिकावे यासाठी रस्त्यावर तिरपे गतिरोधक बनवायला हवे. दुसरीकडे अनेक शहरात गाड्या वाहून जाण्याचे प्रकार घडले असताना माथेरान सुस्थितीत असल्याबद्दल प्राधिकरणाने केलेल्या नियोजनाचे आणि त्यांच्या अभियंत्यांचे कौतुक करायला हवे.

नितीन सावंत
संयुक्त व्यवस्थापन समिती सदस्य
Exit mobile version