आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर 27,162 बॅनर,पोस्टर हटवले
रायगड । सुयोग आंग्रे ।
राज्यात निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.आदर्श आचारसंहितादेखील लागू केली आहे. आचारसंहिता लागू होताच जिल्ह्यातील एक महापालिका, 10 नगरपरिषद, 5 नगरपंचायती आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध चौकात, खासगी जागेवर, शासकीय जागांवर लावण्यात येणारे राजकीय बॅनर, पोस्टर आणि झेंडे हटविण्याची कारवाई सुरू केली. त्यानुसार 72 तासांत जिल्ह्यातील सात विधानसभा क्षेत्रातील तब्बल 27 हजार 162 बॅनर, पोस्टर, कटआऊट, भिंतीपत्रक आणि झेंडे हटविले आहेत. या कारवाईमुळे जिल्ह्यातील बॅनर, पोस्टरने गुदमरलेल्या चौक, नाक्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.
रायगड जिल्ह्यातील 7 विधानसभा क्षेत्रात निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या राजकीय पुढार्यांसह आजी-माजी लोकप्रतिनिधींनी चौकाचौकांत राजकीय पक्षांच्या नेत्यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा देणारे फलक लावले होते, तसेच पक्षात मोठे पद मिळालेल्या नेत्यांना शुभेच्छा देणारे फलक लावले होते. हे फलक लावल्यानंतर ते काढण्याची तसदी मात्र त्यांच्याकडून घेण्यात येत नसल्याचेदेखील दिसून येत असते. यामुळे बरेच दिवस हे फलक त्याच जागेवर दिसून येतात. या फलकांमुळे शहरातील चौक व नाके यांचे विद्रुपीकरण होते. अशा बेकायदा फलकांवर स्थानिक स्वराज्य संस्थांकडून फारशी कारवाई होत नसल्याची ओरड सातत्याने होत असते. त्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून राजकीय बॅनरबाजीचे प्रमाण वाढले होते. रायगड जिल्ह्यातील शहरांमधील आणि गावागावांमधील नाक्यानाक्यांवर आणि चौकाचौकात राजकीय पक्षांच्या नेत्यांचे फलक झळकताना दिसून येत होते, तर कुठे केलेल्या कामाचे श्रेय घेणारे फलकदेखील लावण्यात आले होते. यामुळे विद्रुपीकरण झाल्याचे चित्र होते.
मंगळवारी दुपारनंतर विघानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली.रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांत येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील बेकायदापणे लावलेले राजकीय बॅनर, पोस्टर, भिंतीपत्रके, झेंडे काढून टाकण्याची कारवाई करण्यास सुरुवात केली. त्यानुसार मागील 72 तासात प्रशासनाने शासकीय, सार्वजनिक व खासगी मालमत्तांवरील 6443 बॅनर, 4542 पोस्टर, 2911 भिंती पत्रके आणि 13286 कटआऊट आणि झेंडे हटविले आहेत.
कारवाईची आकडेवारी (7 विधानसभा मतदारसंघांतील)
भिंतीपत्रक -2911
पोस्टर्स - 4542
बॅनर - 6443
झेंडे, कटाऊट -13286
एकूण - 27162