। रोहा । जितेंद्र जोशी ।
रोहा पंचायत समिती नवनियुक्तगटविकास अधिकारी शुभदा पाटील-कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आझादी का अमृत महोत्सवफ अंतर्गत नागोठणे येथे महिला बचतगटांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या निमंत्रण पत्रिकेत पेण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वगळता जिल्ह्यातील एकाही लोकप्रतिनिधींचे नाव नसल्याने रोहा पंचायत समिती गटविकास अधिकार्यांना लोकप्रतिनिधींचे वावडे आहे का,असा सवाल उपस्थित केला जात आहे. या निमंत्रण पत्रिकेत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या स्थानिक पुढार्यांना प्रमुख पाहुणे म्हणून स्थान देण्यात आल्याने पंचायत समितीच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
एका खासदारासह जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघापैकी तीन आमदार तसेच विधान परिषदेचे तीन आमदार रोहा तालुक्याचे प्रतिनिधित्व करीत आहेत. गटविकास अधिकारी यांनी याची माहिती न घेता तयार केलेल्या निमंत्रण पत्रिकेमुळे नाराजी व्यक्त होत असल्याचे बोलले जात आहे. याबाबत काही कार्यकर्त्यांनी गटविकास अधिकार्यांना विचारणा केली असता रात्री 11 वाजता नव्याने निमंत्रण पत्रिका तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली. मात्र 12 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता असणार्या कार्यक्रमाची नवीन निमंत्रण पत्रिका 11 ऑगस्टला रात्री 11 वाजता तयार करून पाठविणे म्हणजे कार्यकर्त्यांच्या व लोकप्रतिनिधीच्या तोंडाला पाने पुसण्याचाच प्रकार होता.
याबाबत 12 ऑगस्ट रोजी गटविकास अधिकारी यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांची भेट होऊ शकली नाही. काही पक्षांच्या स्थानिक पुढार्यांना झुकते माप देणार्या गटविकास अधिकार्यांना यामुळे भविष्यात अन्य पक्षीय पदाधिकार्यांच्या रोषाला सामोरे जावे लागणार असल्याचे दिसून येत आहे.