तात्काळ कठोर कारवाईची तहसीलदारांकडे मागणी
| चणेरा | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील भीमाशंकर अभयारण्य परिसरातील सह्याद्रीच्या घनदाट जंगलात टोरेंट पॉवर कंपनीकडून होणाऱ्या वृक्षतोडीच्या विरोधात रोहेकर जनता व पत्रकारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या वृक्षतोडीमुळे पश्चिम घाटातील जैवविविधतेला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करत वृक्षतोडीला तात्काळ स्थगिती द्यावी. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणीचे पत्र तहसीलदार डॉ. किशोर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
भीमाशंकर अभयारण्य या परिसरात राज्यप्राणी शेकरू, बिबट्या, अस्वल यांसह अनेक दुर्मिळ वन्यजीव आणि वनस्पतींचे अस्तित्व आहे. अशा संवेदनशील वनक्षेत्रात टोरेंट पॉवर कंपनीच्या प्रस्तावित हायड्रो अथवा वीज पारेषण प्रकल्पासाठी हजारो वृक्षांची कत्तल सुरू असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडण्याबरोबरच वन्यजीवांच्या अधिवासावरही गंभीर परिणाम होऊ शकतो अशी चिंता पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. यावेळी प्रेस क्लब अध्यक्ष डॉ. श्याम लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते आप्पा देशमुख, पर्यावरणप्रेमी राजेंद्र जाधव, सुहास खरीवले, महेंद्र मोरे, रघुनाथ कडू, बळीराजा फाऊंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल मोरे, सागर जैन, महेश बामुगडे, शरद जाधव, संतोष सातपुते, जितेंद्र जाधव, दीपक भगत, अंजुम शेटे आदी उपस्थित होते.
