ग्रामीण रस्ते खड्ड्यात

प्रशासकीय राजवटीमुळे कामे रखडली; खड्डेमय रस्त्यांमुळे विकासाला ब्रेक

। अलिबाग । प्रमोद जाधव ।

रायगड जिल्हा परिषदेवर गेल्या दोन वर्षापासून प्रशासकीय राज आहे. अधिकार्‍यांमार्फत गावांचा विकास होईल, अशी आशा जिल्ह्यातील नागरिकांना होती. मात्र, गावे-वाड्यांतील नागरिकांची घोर निराशा जिल्हा परिषद प्रशासनाने केल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील दोन हजार 500 किलोमीटरचे रस्ते आजही खड्ड्यात आहेत. या खड्डेमय रस्त्यांमुळे गावांच्या विकासाला ब्रेक लागल्याचे बोलले जात आहे.

रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारित एक हजार 900 वाड्यांचा समावेश असून, ग्रामीण भागाची लोकसंख्या सुमारे 16 लाख इतकी आहे. गावांतील रस्त्यांची लांबी पाच हजार 500 किलोमीटर असून, जिल्ह्यातील दोन हजार 500 किलो मीटरचे रस्ते खराब झाले आहेत. अतिवृष्टीमुळे हे रस्ते खराब झाल्याची माहिती समोर येत आहे.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावांचा विकास केला जातो. गावांमध्ये रस्ते व अन्य सुविधा राबविल्या जातात. मात्र, खराब झालेल्या अडीच हजार किलोमीटरच्या रस्त्यांची दुरूस्ती केली नसल्याने गावांच्या विकासावर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. गावांपर्यंत जाण्यासाठी खड्डेमय रस्ते असल्याने प्रवास करताना भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खड्डेमय रस्त्यामुळे अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामविकास विभागाकडून सुमारे 14 कोटी रुपयांचा निधी जिल्ह्यासाठी मंजूर केला आहे. जिल्हा परिषदेकडून त्याची निविदाही काढण्यात आली आहे. पावसाळ्यापूर्वी ही कामे करण्याचा नियोजन जिल्हा परिषदेने केले आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीत ही कामे मुदतीत होतील का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

अडीच हजार किलोमीटरचे रस्ते खराब झाले आहेत. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, पावसाळ्यापूर्वी रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे केली जातील.

पी. राऊत,
कार्यकारी अभियंता, जि.प.

मागील दोन वर्षांपासून रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आलेली नाहीत. परिणामी, जनतेला खड्डेमय रस्त्यातून वाट काढावी लागत आहे. निधी मंजूर असतानाही कामे होत नाहीत, यामुळे जनतेमध्ये तीव्र संताप आहे. लवकरात लवकर रस्त्याची कामे हाती घेण्यात यावीत.

जयवंत तांबाटकर,
सामाजिक कार्यकर्ते
Exit mobile version