| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील सागरचं केळवण अलीकडेच पार पडलं. केळवणासाठी ही जोडी थेट अलिबागमध्ये पोहोचली होती. स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत सध्या मुक्ता गोखले आणि सागर कोळी यांच्या लग्नाची धामधूम सुरू झाली आहे. आतापर्यंत मालिकेच्या कथानकामध्ये साखरपुडा, मेहंदी, संगीत आणि हळद हे कार्यक्रम पार पडले आहे. 25 डिसेंबरपासून ‘प्रेमाची गोष्ट’चे विवाह स्पेशल एपिसोड पाहायला मिळतील. त्यापूर्वी एका खास सोहळ्यासाठी मुक्ता आणि सागर अलिबागमध्ये पोहोचले आहेत. त्यांचा एक व्हिडिओही इन्स्टाग्रामवर समोर आला आहे.
मुक्ता आणि सागर यांचं केळवण थेट अलिबागमध्ये पार पडलं. सोशल मीडियावर विशेष लोकप्रिय असणाऱ्या नलिनी मुंबईकर या इन्फ्लूएन्सर काकूंनी त्यांचे केळवण केले. कोळी कुटुंबातील सागरचे केळवण असल्याने त्यांनी यावेळी खास माशांचा बेत केला तर मुक्ता गोखलेसाठी शाकाहारी जेवणाची मेजवानी होती. नलिनी यांनी सोशल मीडियावर या केळवणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. मुक्ता आणि सागर यांच्यासह सागरची आई इंद्रा कोळी आणि लेक सईदेखील या केळवणासाठी पोहोचल्या होत्या. यावेळी अलिबागकरांनी अत्यंत पारपंरिक आणि कोळी स्टाइलने ‘प्रेमाची गोष्ट’मधील कलाकारांचे स्वागत केले. यावेळी मुक्ताने खास उखाणाही घेतला.
नलिनी यांनी हा व्हिडिओ शेअर करताना असे लिहिले आहे की, ‘सागर मुक्ताचं केळवण.. मंडळी तुम्हाला माहीतच आहे की स्टार प्रवाहवरच्या प्रेमाची गोष्ट मालिकेत सागर कोळी आणि मुक्ता गोखले यांच्या लग्नाची धामधूम सुरू आहे. लग्नाच्या अगोदर आपल्याकडे होतं ते म्हणजे केळवण आणि म्हणूनच आपल्या अलिबागच्या कोळीणबाय नलिनी काकू मुंबईकर यांनी त्यांना कोळी पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमंत्रण दिलं आहे. सागरसाठी मासे आणि मुक्तासाठी भाजी अशा दोन्ही प्रकारचे पदार्थ बनवलेले आहेत. सोबत सई आणि इंद्रा आजी आहे म्हटल्यावर धमाल तर होणारच आहे.’ सोशल मीडियावर मुक्ता-सागरच्या या केळवणाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.






