वेतन व भविष्य निर्वाह निधी मधून ना परतावा निधी मंजूर करण्यासाठी मागितली लाच
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
भविष्य निर्वाह निधीमधून ना परतावा निधी मंजूर करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या वेतन व भविष्य निर्वाहनिधी पथक (माध्यमिक) अलिबाग कार्यालयातील मुख्य लिपिक आणि सहा. लेखाधिकारी याच्यासह कनिष्ठ लिपिक अशा तिघा लाचखोराना रायगडच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. सहा.लेखाधिकारी प्रशांत पांडुरंग तावडे (वय-45 वर्षे), मुख्य लिपिक राजेंद्र रामचन्द्र गायकवाड, (वय 57 वर्षे), कनिष्ठ लिपिक रुपेश सुभाष देशमुख, (वय 32 वर्षे) असे या तीन लाचखोरांची नावे आहेत.
तक्रारदाराने भविष्य निर्वाह निधीमधून ना परतावा निधी मंजूर करन्यासाठी वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालयात 25 मे रोजी प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्ताव मंजूर करण्यासाठी सहा.लेखाधिकारी प्रशांत पांडुरंग तावडे, मुख्य लिपिक राजेंद्र रामचन्द्र गायकवाड, कनिष्ठ लिपिक रुपेश सुभाष देशमुख या तिघांनी तीन हजार रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे त्यांच्या विरोधात रायगडच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. सदर तक्रारीची शहानिशा करून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक सुषमा सोनवणे यांनी सापळा रचला. त्यानुसार आज 1 जून रोजी सकाळी 11.48 वा. सदर तक्रारदारांकडून तीन हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
पोलिस उपअधीक्षक सुषमा सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार अरुण करकरे, विनोद् जाधव, महेश पाटील, पोलिस नाईक सचिन आटपटकर, जितू पाटील यांचा समावेश होता. दरम्यान रायगड जिल्ह्यातील सर्व नागरीकांना पोलिस उपअधीक्षक सुषमा सोनावणे यांनी आवाहन केले आहे की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे मो.नं. 9702706333/ 8169345385 येथे संपर्क साधावा.