गुटखा, सिगारेटची राजरोसपणे विक्री

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

पनवेल बस स्थानक परिसरात बेकायदेशीर चहाच्या टपऱ्या

। पनवेल । प्रतिनिधी ।

पनवेल बस स्थानक परिसरात महाराजा स्वीटस कॉर्नरसमोर उड्डाणपूलाखाली रात्रीच्या वेळी नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीर चहाच्या टपऱ्या आणि दुकाने रात्रभर सुरू राहत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या टपऱ्यांवर प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू आणि सिगारेटची राजरोसपणे मोठ्या प्रमाणावर विक्री केली जात आहे. या वाढत्या अवैध व्यवसायांवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) तातडीने कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

मुंबई आणि कोकणला जोडणारे मुख्य केंद्र असलेल्या पनवेल बस स्थानक परिसरात सध्या रात्रीच्या वेळी अवैध धंद्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. शासकीय नियमांनुसार ठरावीक वेळेनंतर दुकाने व टपऱ्या बंद करणे बंधनकारक असतानाही, या परिसरात अनेक चहाच्या टपऱ्या आणि स्टॉल्स रात्रभर सुरू राहत आहेत. सर्वात गंभीर बाब म्हणजे, राज्यात बंदी असलेला गुटखा आणि सुगंधित तंबाखू या टपऱ्यांवर अगदी सहज आणि चढ्या दराने विकला जात आहे.

रात्रीच्या अंधारात अनधिकृत व्यवसाय तेजीत :
रात्रीच्या वेळी एसटीने प्रवास करणारे प्रवासी, चालक आणि वाहक यांच्या नावाखाली हे चहाचे स्टॉल्स सुरू ठेवले जातात. मात्र, मध्यरात्रीनंतर या ठिकाणी स्थानिक टवाळखोर, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आणि अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांची गर्दी वाढत असल्याचे दिसून येत आहे. चहाच्या आडून ‘सिगारेट आणि गुटखा उपलब्ध’ असल्याचे फलक लावून किंवा छुप्या पद्धतीने अमली पदार्थांची विक्री केली जात आहे.

आरोग्याशी खेळ :
महाराष्ट्र राज्यात गुटखा आणि सुगंधित तंबाखूच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी आहे. असे असतानाही पनवेल डेपोबाहेर याची राजरोस विक्री अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते.

अस्वच्छता आणि भेसळ :
रात्रभर उघड्यावर बनवला जाणारा चहा आणि खाद्यपदार्थ अत्यंत अस्वच्छ वातावरणात तयार केले जातात, ज्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

गुन्हेगारीला खतपाणी :
रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या या गर्दीमुळे परिसरात वादावादी आणि हाणामाऱ्यांचे प्रकार घडत असून, महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष :
स्थानिक पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) या गंभीर प्रकाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. केवळ एखादी थातुरमातूर कारवाई न करता, अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी या ठिकाणी रात्रीच्या वेळी अचानक छापे टाकून अवैध साठा जप्त करणे आणि संबंधित टपरी चालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करणे गरजेचे आहे. ‘प्रवाशांच्या हक्काच्या आणि सुरक्षिततेच्या पनवेल बस स्थानक परिसराला अशा अवैध धंद्यांचे केंद्र बनू देऊ नये, यासाठी प्रशासनाने तात्काळ मोहीम हाती घ्यावी,’ अशी तीव्र भावना पनवेलमधील सुजाण नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Exit mobile version