5 आरोपींवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव तालुक्यात जमीन विक्रीच्या फसवणूकीचे सर्रास प्रकार उघडकीस येत असून अशाच एका जमीन विक्री प्रकारात तोतया इसम उभा करून फोटो लावून सही घेऊन जमिनीची संगनमताने विक्री केल्याप्रकरणी 5 आरोपींवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरच्या गुन्ह्याची फिर्याद राजेश जयराम पाकड (वय-35) रा.उधळेकोंड शिरसाड ता.माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
सदर गुन्ह्याबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, यातील फिर्यादी राजेश जयराम पाकड यांचे वडील जयराम चंदू पाकड यांचे मालकीचे उधळेकोंड शिरसाड ता.माणगाव जि.रायगड येथील सर्वे नं.16/9 क्षेत्र 0-39-30 अशी नावे असून ते जमीनक्षेत्राचे विक्री करण्याचे अखत्यारपत्र आरोपी प्रकाश पांडुरंग पाकड रा.उधळेकोंड शिरसाड ता.माणगाव याने मिळविणे कामी फिर्यादी यांच्या वडिलांच्या जागी तोतया म्हणून आरोपी सुधीर गंगाराम लाड रा.मळ्याची वाडी ता.माणगाव यांस उभे करून त्यांचा फोटो लावून ही माहिती दुय्यम निबंधक माणगाव यांच्या कार्यालयात सादर केली. त्याची नोंद करून त्या बनावट नोंदणीकृत अखत्यारपत्राचे आधारे सदरचे जमीनक्षेत्र हे आरोपी यांनी संगनमताने पियुष विलास जैन रा.इंदापूर ता.माणगाव यांना 4 लाख रुपयाला आपल्या आर्थिक फायद्याकरिता विक्री केली.
या गुन्ह्याप्रकरणी आरोपींवर माणगाव पोलीस ठाण्यात कॉ.गु.रजि.नं.58/2022 भादवि संहिता कलम 193, 198,200, 420, 465, 468, 471, 34 सह नोंदणी अधिनियम 1908 चे कलम 82 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर.पी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार जितेंद्र वाटवे हे करीत आहेत.