शेतकरी संतप्त! ‘या’ अधिकार्‍यांचा माती देऊन होणार सत्कार

खारभूमी नापिक क्षेत्राची माहिती मिळवण्यासाठी जनआंदोलन; एक दिवसीय भजनी आंदोलन
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील खारभूमी नापिक क्षेत्राची माहिती मिळावी, यासाठी जनआंदोलन करण्याचा निर्धार श्रमिक मुक्ति दलाने केला आहे. याचाच एक भाग म्हणून माहिती न दिलेल्या विभाग प्रमुखांचा खारेपाटातील माती देऊन सत्कार केला जाणार आहे. शिवाय एक दिवसीय भजनी आंदोलन केले जाणार आहे.

20 जुलैपर्यंत अल्टिमेटम
20 जुलैपर्यंत याबाबत ठोस निर्णय घेण्याची कृती झाली नाही, तर माहिती न देणारे विभाग प्रमुखांचा सत्कार खारेपाटातील माती देऊन केला जाईल. तसेच दुसर्‍या टप्प्यात जिल्हाधिकारी रायगड यांचे कार्यालयासमोर भजनी आंदोलन करण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे श्रमिक मुक्तिदलाचे प्रा.सुनील नाईक, अरविंद पाटील, गंगाधर पाटील, दयानंद पाटील, राजन भगत, जयेश पाटील यांनी सुचित केले आहे.

खारभूमी विभागाचा गलथान कारभार; शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळणे अडचणीचे
खारभूमी विभागाने नापीक केलेल्या अलिबाग तालुक्यातील मेढेखार, काचली-पिटकिरी, वाघवीरा या गावातील सुमारे 540 शेतकर्‍यांनी वार्षिक 50 हजार इतकी जमिनीची नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे. नुकसान भरपाईचे अर्ज उपविभागीय अभियंता खारभूमी अलिबाग यांच्याकडे दाखल केले आहेत. त्यानुसार उपविभागीय अभियंता खारभूमी यांनी नुकसान भरपाई मिळण्यासाठी तहसीलदार, अलिबाग यांच्याकडे मागणी केली. त्यांनी त्यास अनुकुलता दर्शवून पुढे उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी यांनी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी असा अहवाल पाठवला आहे. पण प्रत्यक्ष नुकसान भरपाई देण्याचे शासनाने ठरवले तर प्रत्यक्ष 37 खारभूमी क्षेत्रातील कोणत्या गावातील कोणाची जमीन नापीक झाली आहे, त्याची आकडेवारी शासनाकडे नसल्याने नुकसान भरपाई देणे अडचणीचे ठरले जाणार आहे.

Exit mobile version