60 टक्के खारभूमी उपजाऊ; दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
| रायगड | खास प्रतिनिधी |
वाढते औद्यागिकरण आणि नापीक क्षेत्रामुळे भाताचे कोठार अशी ओळख आता पुसली गेली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अलिबाग तालुक्यातील तब्बल 60 टक्के खारभूमी उपजाऊ क्षेत्र नापीक झाल्याचा दावा श्रमिक मुक्ती दलाने केला आहे. तत्कालीन पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी खारभूमी क्षेत्रातील पेरणी होऊ शकत नाही, अशा क्षेत्राचे सर्वेक्षण करावे असे निर्देश महसूल विभागाला दिले होते. मात्र गेल्या सात वर्षात ढिम्म प्रशासनाने काहीच हालचाल केली नाही. परिणामी सदरच्या गावांमध्ये दुष्काळ जाहिर करता येत नसल्याचे वास्तव श्रमिक मुक्ती दलाचे राजन भगत यांनी उघड केले आहे. श्रमिक मुक्ती दलाने दिलेल्या आकडेवारीची खातरजमा करुन अलिबाग तालुक्यातील सुमारे 36 गावांमध्ये दुष्काळ जाहिर करण्याबाबत लोकप्रतिनीधींना अवगत करावे, अशी मागणी देखील भगत यांनी केली आहे. शेतकर्यांचा हा प्रश्न लवकर सोडवण्यात यावा यासाठी शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांची शेतकरी भेट घेणार आहेत, असेही भगत यांनी स्पष्ट केले.
रायगड जिल्हा हा पूर्वी भाताचे कोठार होता. शेतातील भात आणि नदी, खाडी आणि समुद्रातील मासे खाऊन तो समाधानी होता. कालांतराने प्रकल्पांमध्ये मोठ्या संख्येने जाऊ लागल्या. त्यामुळे पिकत्या जमिनीचे क्षेत्र कमी होऊ लागले. त्याचप्रमाणे खारभूमी च्या क्षेत्रात योग्य उपाययोजना न केल्याने खाडी आणि समुद्राचे पाणी शेतात घुसून सदरचे क्षेत्र नापीक झाले आहे. नेमके किती प्रमाणात नापीक झाली आहे. याची आकडेवारी प्रशासनाकडे उपलब्ध नाही. नापीक क्षेत्राचे सर्व्हेक्षण करण्याबाबत तत्कालीन पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी 5 डिसेंबर 2015 रोजी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये याबाबत निर्देश दिले होते. मात्र गेल्या सात वर्षात काहीच हालचाल प्रशासकीय पातळीवरुन झाली नाही. त्यामुळे पेरणी होऊ न शकलेल्या क्षेत्राची माहिती ना कृषी विभाग अथवा महसूल विभागास प्राप्त झालेली नाही. ड्रोनद्वारे सर्व्हेक्षण करण्याचीही मागणी भगत यांनी केली आहे. श्रमिक मुक्ती दलाने दिलेल्या माहिती प्रमाणे अलिबाग तालुक्यातील सुमारे 60 टक्के खारभूमी उपजाऊ जमिनी नापीक झाली आहे. तेथे शून्य उत्पादन असल्याने ती गावे दुष्काळ ग्रस्त म्हणून गणली जाणे गरजेचे असल्याकडे भगत यांनी लक्ष वेधले. म्यान, या प्रकरणाची नेमकी काय स्थिती आहे हे पाहावे लागेल त्यांनतरच सविस्तर बोलता येईल, असे तहसिलदार (महसुल) सचिन शेजाळ यांनी सांगितले.
क्षेत्राची वर्गवारी अलिबाग तालुका
तालुक्यातील भौगोलिक क्षेत्र : 49,901 हेक्टर
भात पीकाखालील क्षेत्र : 17,200 हेक्टर
तालुक्यातील खारभूमी चे क्षेत्र : 7,613 हेक्टर
शेतकरी संख्या : 5,835
तालुक्यातील खारभूमी नापीक क्षेत्र : 3016.62 हेक्टर